भारतीय सैनिकांवर क्रूर हल्ला केल्याचे उघड

भारतीय सैनिकांवर क्रूर हल्ला केल्याचे उघड

गलवान खोर्‍यात चीनी सैनिकांशी लढताना २० भारतीय जवान शहीद झाले. या सैनिकांवर चीनी सैन्याकडून खिळे लावलेल्या रॉडने आणि लोखंडी सळ्यांनी क्रूर हल्ला करण्यात आला होता. आता या जवानांच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक आणि तेवढ्याच क्रूर गोष्टी समोर आल्या आहेत. या जवानांच्या शरीरावर खोल जखमा आढळल्या आहेत. लेहच्या एसएनएम रुग्णालयात जवानांच्या मृतदेहांचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले.

पोस्टमॉर्टेम अहवालानुसार, काही जवानांच्या शरीराचे तापमान कमी झाल्याने (हायपोथर्मिया) त्यांचा मृत्यू झाला. तर काहींचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाला. अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, या जवानांच्या शरीरावर खोलवर जखमा होत्या, त्यावरून या हल्ल्याची क्रूरता लक्षात येत होती. जवळपास १७ जवानांच्या शरीरावर जखमांचे निशाण आहेत. अधिकारी रुग्णालयात उपस्थित आहेत आणि सेना बेसला जवानांच्या मृतदेहांचे फोटो न काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याअगोदर, सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये कर्नल संतोष बाबू यांच्यासहीत तीन जवानांच्या शरीरावर जखमांचे निशाण आढळले नव्हते परंतु त्यांच्या डोक्यावर हत्याराने हल्ला केल्याच्या खुणा आढळल्या होत्या.

जवळपास तीन जवानांचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला. परंतु, इतर जवानांच्या शरीरावर हत्यारांनी मारहाण झाल्याच्या खुणा आहेत. तीन जवानांच्या चेहर्‍यांवर इतक्या जखमा होत्या की ते नीट ओळखूही येत नव्हते. तर आणखी तीन जणांच्या गळ्यावर कापल्याचे निशाण आढळले. अनेकांच्या शरीरावर नखांचेही निशाण आहे. चीनी सैनिकांकडे चाकूही होता.
काही जवान उंचावरून खाली नदीत पडल्याचे आढळने. १४ हजार फुटांच्या उंचीवर गलवान खोर्‍यातील गोठवणार्‍या थंडीत आणि दुर्गम क्षेत्रात मदत न मिळाल्यानेही काही जवानांचा मृत्यू झाला. १२ जवानांचा मृ्त्यू हायपोथर्मियामुळे आणि श्वास गुदमरल्याने झाला. भारत-चीन सीमेवर जवळपास ४५ वर्षानंतर एखाद्या सैनिकाला हौतात्म्य पत्करावे लागले. याअगोदर, १९७५ मध्ये वास्तविक नियंत्रण रेषेवर चीनच्या हल्ल्यात भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. तेव्हा अरुणाचल प्रदेशात चीननं भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता यात चार सैनिक हुतात्मा झाले होते.

First Published on: June 19, 2020 4:59 PM
Exit mobile version