अहमदाबादमध्ये मुलीबद्दल जाब विचारायला गेलेल्या बीएसएफ जवानाची हत्या

अहमदाबादमध्ये मुलीबद्दल जाब विचारायला गेलेल्या बीएसएफ जवानाची हत्या

अहमदाबादः मुलीचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल केल्याचा जाब विचारणाऱ्या बीएसएफ जवानाची एका कुटुंबाने मारहाण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना गुजरात येथील नडियाद येथे घडली आहे. मेलाजी वाघेला असे मृत जवानाचे नाव आहे.

शनिवारी ही घटना घडली. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या जवानाची मुलगी शिक्षण घेत असलेल्या शाळेतच आरोपी शैलेश उर्फ सुनील जाधव शिकत आहे. शैलेशने मुलीचे अश्लिल व्हिडिओ काढले. ते व्हिडिओ त्याने सोशल मिडियावर टाकले. काही दिवसातच ते व्हिडीओ व्हायरल झाले. त्याचा जाब विचारण्यासाठी बीएसएफ जवान मुलाच्या कुटुंबियांकडे गेला होता. त्यावेळी जवानासोबत त्याचा मुलगा व त्याची पत्नी होती. तेव्हा शैलेश घरात नव्हता. मुलाच्या घरच्यांनी बीएसएफ जवानाला काठ्या व धारधार शस्त्राने मारहाण केली. त्यात जवानाचा जागीच मृत्यू झाला. तसेच मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अहमदाबाद येथील सरकारी रुग्णालयात मुलावर उपचार सुरु आहेत.

जवानाची पत्नी मुंजळाबेन यांनी याची पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केला. मात्र ही घटना घडल्यानंतर संबंधित मुलाचे कुटुंब गाव सोडून पळून गेले होते. पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेण्यासाठी आजुबाजुच्या गावात चौकशी करत होते. आरोपी हे शेजारील गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सातही आरोपींना सोमवारी अटक केली. त्यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. तसेच हळहळही व्यक्त होत आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी तीव्र शब्दांत या घटनेचा निषेध केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. गुजरातमध्ये बीएसएफ जवानाच्या मुलीचे एका मुलाने अश्लिल व्हिडिओ काढून ते व्हायरल केले. जवान त्या मुलाच्या घरी गेला तर त्याची हत्या करण्यात आली. या घटनेची चर्चा होत आहे. मात्र मिडियामध्ये ही बातमी आली नाही. ही हत्या म्हणजे आपल्यासाठी लज्जास्पद आहे. गुंडांची हिमत वाढली आहे, असे मालिवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

First Published on: December 27, 2022 3:25 PM
Exit mobile version