चीनमध्ये आता ब्युबॉनिक प्लेगला सुरुवात, WHO म्हणतंय हम है ना!

चीनमध्ये आता ब्युबॉनिक प्लेगला सुरुवात, WHO म्हणतंय हम है ना!

आख्ख्या जगाला ज्या विषाणूनं गुडघे टेकायला लावलं आहे, त्या कोरोना विषाणूचा जन्म चीनमध्ये झाल्याचं जवळपास सिद्ध झालं आहे. पण आता तिथूनच एका नव्या विषाणूचा जन्म झाला आहे. त्याला ब्युबॉनिक प्लेग किंवा काली मौत असंही म्हटलं जात आहे. चीनच्या इनर मंगोलियामध्ये याची प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे जगात पुन्हा एकदा भितीचं सावट पसरलं असताना जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO नं मात्र यावर संयमी प्रतिक्रिया देत आम्ही या विषाणूच्या फैलावावर लक्ष ठेऊन असून परिस्थिती अद्याप नियंत्रणाच्या बाहेर गेलेली नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या जरी जगानं सुटकेचा नि:श्वास टाकला असला, तरी या विषाणूचीही साथ कोरोनाप्रमाणेच तर पसरणार नाही ना? अशी भिती देखील व्यक्त केली जात आहे.

१९व्या शतकात सापडला होता विषाणू

ब्युबॉनिक प्लेग हा उंदरांपासून पसरणारा विषाणू आहे. १९व्या शतकाच तो चीनच्याच युनान प्रांतात सापडला होता. तिथूनच त्याचा प्रसार जगभर झाला होता. १८९४दरम्यान अफीम व्यापाऱ्यांच्या केंद्रांमधून त्याचा फैलाव जगभर झाला होता WHOच्याच आकडेवारीनुसार २०१० ते २०१५ या काळात जगभरात ब्युबॉनिक प्लेगचे ३ हजार २४८ रुग्ण सापडले होते. त्यातल्या ५८४ रुग्णांचा मृत्यू देखील ओढवला होता. १९९४मध्ये गुजरातच्या सूरतमध्ये देखील ब्युबॉनिक प्लेगचाच फैलाव झाला होता.

ब्युबॉनिक प्लेग हा एक साथीचा आजार असून येरसीनिया पेस्टिस नावाच्या एका बॅक्टेरियामार्फत त्याचा फैलाव होतो. हा बॅक्टेरिया उंदरांच्या शरीरावर राहणाऱ्या पिसव्यांमध्ये असतो. यालाच काली मौत असं देखील म्हणतात.

WHO च्या प्रवक्त्या मार्गेट हेरिस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेल्या माहितीनुसार चीन आणि मंगोलिया प्रशासनासोबत आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे आम्ही तिथल्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. सध्याची परिस्थिती पाहाता ब्युबॉनिक प्लेगबाबत घाबरण्याचं काहीही कारण नाही.

First Published on: July 8, 2020 6:27 PM
Exit mobile version