बैलाच्या ढुंगणाला आली खाज, गेली ८०० घरांची वीज!

बैलाच्या ढुंगणाला आली खाज, गेली ८०० घरांची वीज!

हेच ते बैलोबा!

खरंतर, आपल्याकडे लाईट जायला कोणतंच कारण लागत नाही, असं म्हणतात. इथे कोणत्याही कारणामुळे लाईट जाऊ शकते. आपल्या इथल्या ग्रामीण भागात तर तासन् तास लाईट नसते. आपल्याला वाटतं, फक्त आपल्याच देशात विजेचा असा अजब कारभार सुरू असतो. पण स्कॉटलंडमध्ये देखील आपल्यासारखीच परिस्थिती उद्भवू शकते, हे नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून समोर आलं आहे. हे वृत्त बाहेर आलं आणि नेटिझन्सची पार हसून हसून पुरेवाट झाली. एका बैलामुळे स्कॉटलंडच्या साऊथ लॅनर्कशायर या भागामधल्या तब्बल ८०० घरांची वीज गायब झाली. प्रकरण इतकं वाढलं की शेवटी या बैलाच्या मालकिणीला त्याने केलेल्या प्रतापासाठी त्याच्या वतीने जाहीर माफी देखील मागावी लागली!

नक्की केलं काय या बैलोबांनी?

तर या बैलोबांचं नाव आहे रॉन! आपल्याकडच्या ढवळ्या-पवळ्यासारखंच कदाचित तिकडे रॉन ठेवत असावेत! तर या रॉन बैलोबांना त्यांच्या मालकिण हेझल लाफटन यांनी साऊथ लॅनर्कशायरमधल्या आपल्या घराबाहेरच्या शेतात बांधलं होतं. रात्री त्या झोपल्या आणि सकाळी उठून पाहतात तर त्यांच्या घराबाहेर जनरेटर्सची मोठी रांग आहे आणि समोरच्या बाजूला एका विजेच्या पोलवरचा इलेक्ट्रिक बॉक्स जमिनीवर पडला आहे. आणि त्यांचे बैलोबा त्या पोलच्या शेजारी उभे आहेत. खरा प्रकार जेव्हा त्यांना कळला, तेव्हा त्यांना काय करावं तेच सुचेना झालं!

तर झालं असं, की हेझल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या बैलाला ढुंगण खाजवायची फार सवय आहे. तर त्या दिवशी भल्या पहाटे या बैलोबांच्या ढुंगणाला खाज सुटली. खाजवण्यासाठी त्यांनी थेट विजेच्या खांबाचाच आधार घेतला. आता व्हायचा तोच परिणाम झाला. यांनी लावला जोर आणि विजेच्या पोलवरचा इलेक्ट्रिक बॉक्स थेट खाली आला. झालं. त्या भागातल्या जवळपास ८०० घरांमधली वीज एका झटक्यात गायब झाली.

बैलोबांनीही मागितली माफी

शेवटी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने ‘घटनास्थळी’ धाव घेत या बैलोबांना तिथून दुसरीकडे हलवलं. पूर्ण दिवस त्या पोलवर काम केलं, तेव्हा कुठे रात्री त्या भागात वीज पुन्हा अवतरली. या पोलवर तब्बल ११०० व्होल्टचा करंट असतो. त्यामुळे आपल्या बैलोबांना खाजवणं जीवावर बेतलं नाही, यातच हेझल नशीब मानतायत. त्यावर परिसरातल्या नागरिकांना जो त्रास सहन करावा लागला, त्यासाठी त्यांनी जाहीर फेसबुक पोस्ट करून माफी देखील मागितली आहे. वर त्यांनी बैलाच्या वतीने देखील माफी मागितली आहे!

First Published on: May 12, 2020 12:02 PM
Exit mobile version