CAA हा कायदा केवळ निर्वासितांसाठी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

CAA हा कायदा केवळ निर्वासितांसाठी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

करून करून भागले...!

सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत देशातील काही राजकीय पक्ष अफवा पसरवण्याचं काम करत आहेत. जनतेशी दिशाभूल करत आहेत. खोटे व्हिडिओ दाखवून पण या कायद्याचा आणि देशातील मुस्लिमांचा काहीही संबंध नाही, असे आश्वास्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात डिटेंशन सेंटरच नसल्याचं स्पष्ट केलं. दिल्लीतील १७३४ अवैध वसाहती वैध करण्यासाठीच्या मुद्द्यावर सकाळी ११ वाजता रामलीला मैदानात भाजपाकडून ‘धन्यवाद’ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनआरसी, सीएए कायदा यासोबतच दिल्लीच्या सद्य परिस्थितीला जबाबदार विरोधकांवर हल्लाबोल केला.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मागील काही दिवसांपासून देशातील कानाकोपऱ्यात आंदोलक रस्त्यावर उतरत आहेत. यावर नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर सभेत भाष्य केले. ते म्हणाले की, “काँग्रेससह देशातील काही दलित नेते, नक्षलवादी हे सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत देशातील जनतेची दिशाभूल करत आहेत. अर्बनी नक्षली लोक देशात अफवा पसरवत आहेत. एवढेच नाहीत तर खुद्द पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्यांचीसुद्धा घुसखोरांना हाकलून देण्याबाबत भूमिका होती.”

देशातील हिंसाचाराला काँग्रेसची मूक संमती

“सध्या देशात तणावाचे वातावरण असताना हा तणाव निवळण्यासाठी तसेच देशाच्या शांततेसाठी काँग्रेसकडून शांततेचे आवाहन का करण्यात येत नाही,” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील हिंसाचाराला काँग्रेसची मूक संमती असल्याचे म्हणत सोनिया गांधी यांचे नाव न घेता काँग्रेसवर हल्लाबोल केला.

दिल्लीतील समस्यांना ‘आप’ला धरले धारेवर

दिल्लीतील प्रदुषण आणि अस्वच्छ पाणीपुरवठ्यावर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. दिल्लीतील हवेच्या वाढत्या प्रदुषणाला आळा बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात आल्याचे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. त्यासाठी राज्यात सीएनजी सेंटर्स उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दिल्लीतील पाणीप्रश्नावरही त्यांनी केजरीवाल सरकारला धारेवर धरले. आज देशातील इतर भागांपेक्षा दिल्लीत मोठ्या प्रमाणात वॉटर प्युरिफायर यंत्रांची विक्री होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. दिल्लीत कोणत्याही पक्षाने प्रामाणिकपणे काम केले नाही, असे म्हणत मोदींनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर जोरदार टीकाही केली.

First Published on: December 22, 2019 3:03 PM
Exit mobile version