CAA : कोरोना लसीकरण पूर्ण होताच सीएएची अंमलबजावणी; अमित शहा यांची घोषणा  

CAA : कोरोना लसीकरण पूर्ण होताच सीएएची अंमलबजावणी; अमित शहा यांची घोषणा  

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकांच्या दृष्टीने सध्या भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अनेक दिग्गज नेते बंगालचा दौरा करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेसुद्धा बंगालमध्ये दाखल झाले असून त्यांनी आपल्या भाषणामधून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच शहा यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी (सीएए) महत्वाचे विधान केले. कोरोना लसीकरण पूर्ण झाल्यावर पश्चिम बंगालच्या मतुआ समुदायासह सीएए अंतर्गत शरणार्थींना भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे शहा म्हणाले.

भाजप पक्ष दिलेली आश्वासने पूर्ण करतो

आम्ही जनतेशी खोटे बोलतो असा ममता दीदींनी आमच्यावर आरोप केला. तसेच त्यांनी सीएएला विरोध करण्यास सुरुवात केली आणि आपण बंगालमध्ये सीएएला कधीच परवानगी देणार नाही असे त्या म्हणाल्या. परंतु, भाजप पक्ष दिलेली आश्वासने नेहमीच पूर्ण करतो. आम्ही हा नवीन कायदा आणला आणि त्यामुळे निर्वासितांना नागरिकत्व मिळेल. कोरोना लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होताच आम्ही सीएए अंतर्गत आपणा सर्वांना नागरिकत्व देण्याचे काम करू, असे अमित शहा त्यांच्या ठाकूरनगर या मतुआबहुल भागातील रॅलीमध्ये म्हणाले.

ममता दीदी विरोध करू शकणार नाहीत

मतुआ समाज हा मूळचा पूर्व पाकिस्तानचा असून, विभाजन आणि बांगलादेश निर्मितीनंतर ते भारतात स्थलांतरित झालेल्या दुर्बल घटकातील हिंदू आहेत. त्यापैकी बर्‍याच जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले असले तरी अजूनही काही लोकांना ते मिळाले नाही. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकांनंतर ममता बॅनर्जी मुख्यमंत्री राहणार नाहीत. त्यामुळे सीएएच्या अंमलबजावणीला त्या विरोध करू शकणार नाहीत असेही शाह यांनी सांगितले.

 

First Published on: February 11, 2021 9:22 PM
Exit mobile version