१ फेब्रुवारीपासून आवडीच्याच चॅनलचे पैसे द्या!

१ फेब्रुवारीपासून आवडीच्याच चॅनलचे पैसे द्या!

टीव्ही रिमोट

जे चॅनल्स ग्राहकांना पाहायचे आहेत, तेवढ्याच चॅनलचे पैसे केबल कंपन्या आणि डिश टीव्ही सेवा पुरवठादार कंपन्यांना आकारता येतील असा महत्त्वपूर्ण निर्णय ट्राय अर्थात टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने घेतल्यानंतर देशभरात या कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, २७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत टीव्ही सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, त्याचा काहीही परिणाम ट्रायवर झालेला नाही. त्यामुळे आता केबल चालक आणि डिश टीव्ही कंपन्यांना ट्रायच्या आदेशांची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. दरम्यान, या अंमलबजावणीसाठी ट्रायने या कंपन्यांना महिन्याभराची मुदत वाढवून दिली आहे.

३१ जानेवारीपर्यंत मिळाली मुदतवाढ

२९ डिसेंबरपासून ट्रायने घेतलेल्या या नव्या निर्णयाची अंमलबजावणी करणं या कंपन्यांवर बंधनकारक होतं. मात्र, त्याविरोधात आवाज उठवत या कंपन्यांनी २७ डिसेंबर रोजी ब्लॅकआऊट करत निषेध नोंदवला. तसेच, ट्रायच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याला नकार दिला. मात्र, ट्रायसोबत झालेल्या बैठकीमध्ये ट्रायने या कंपन्यांची मागणी फेटाळून लावल्यामुळे आता या कंपन्यांना ग्राहकांना हव्या त्याच चॅनलसाठी पैसे आकारता येणार आहेत. यासाठी कंपन्यांना ट्रायने ३१ जानेवारीपर्यंतची वेळ दिली आहे.

ग्राहकांनाही महिन्याभराची मुदत

ट्रायच्या निर्णयानुसार सर्व ग्राहकांना सध्या सुरु असलेल्या प्लान्समधून नव्या प्लानमध्ये मायग्रेट करण्यासाठी कंपन्यांकडून मुदतवाढीची मागणी केली होती. विनाअडथळा सेवा पुरवण्यासाठी हा कालावधी आवश्यक असल्याचं या कंपन्यांकडून ट्रायला सांगण्यात आलं. त्या पार्श्वभूमीवर ट्रायने कंपन्यांना मुदवाढ दिली आहे. या दरम्यान, संबंधित कंपन्यांना सर्व ग्राहकांना त्यांच्या आवडीच्याच चॅनलचे बिल द्यावे लागणार आहे. शिवाय, प्रत्येक चॅनलची एमआरपी देखील जाहीर करावी लागणार आहे.


हेही वाचा – केबल ऑपरेटर्सचा व्यवसाय बंद करण्याचा सरकारचा डाव

दरम्यान, कंपन्यांप्रमाणेच ग्राहकांना देखील ही मुदतवाढ लागू आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात ग्राहकांनी त्यांच्या सध्या सुरू असलेल्या प्लानमध्ये बदल करून चॅनलप्रमाणे बिल देण्याच्या प्रणालीनुसार बदल करून घ्यायचे आहेत.

First Published on: December 28, 2018 8:54 PM
Exit mobile version