करोनाचे थैमान लवकरच थांबणार- नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा दावा

जगभरात मृत्यूचे तांडव करणाऱ्या करोना व्हायरसला जेवढा हाहाकार करायचा होता तो त्याने केला. पण आता हळूहळू त्याचा प्रभाव कमी होत असून लवकरच करोनाचे थैमान थांबेल असे दिलासादायक भाकित नोबेल विजेते स्टेनफोर्ड बायोफिजिसिस्ट मायकेल लेविट यांनी केले आहे.

लॉस एंजेल्स टाईम्सशी बोलताना मायकल यांनी करोनाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. त्यावेळी सध्याची परिस्थिती पाहता ती आपण विचार करतोय तेवढी भयंकर नसल्याचे मायकेल यांनी सांगितले. तसेच त्यासाठी त्यांनी चीनमधील सद्यपरिस्थितीचा अहवालही दिला. एकीक़डे जगभरातील तज्ज्ञ करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी बराच काळ लागेल असे सांगत आहेत. पण चीनमध्ये सामान्यजीवन पूर्वपदावर येत आहे. असे लेविट यांनी म्हटले आहे. तसेच हळूहळू करोनाचा प्रभावही कमी होत जाईल व सगळ सामान्य होईल असेही मायकल यांनी यावेळी सांगितले. आपला हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी चीनमधील हुबई प्रांताचा दाखला दिला.

लेविट यांनी फेब्रुवारीमध्ये चीनमध्ये करोनामुळे ३२५० लोकांचा मृत्यू होईल व ८०,००० जणांना त्याची लागण होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र त्याचवेळी जगातील अनेक तज्ज्ञांनी हा आकडा लाखावर जाईल असा दावा केला होता. मात्र मंगळवार पर्यंत चीनमध्ये ३२२७ जणांचा मृत्यू व ८११७१ नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे जाहीर करण्यात आले. लेविट यावरूनच करोनासंदर्भात अभ्यास करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार करोनाची प्राथमिक टप्प्यातच चाचणी करणे गरजेचे आहे. चीन ज्याप्रमाणे करोनाला रोखण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्यारस्त्यावर बॉडी टेंपरेचर सर्विलान्स अभियान सुरू केले आहे. ज्यामुळे करोनाला रोखण्यात चीनला यश येत आहे. यापासून इतर देशांनीही शिकवण घ्यावी व फक्त करोना थर्मल टेस्टींग न करता टेंपरेचर सर्विलान्स सुरु करावे. जेणेकरून एकही करोना संशयित तपासणी यंत्रणेच्या नजरेतून सुटणार नाही असेही लेविट यांनी सूचित केले आहे.

First Published on: March 26, 2020 2:55 PM
Exit mobile version