हरयाणात जातीची समीकरणे महत्त्वाची ठरणार

हरयाणा

हरयाणात लोकसभेसाठी १२ मे रोजी मतदान होत आहे. या राज्यात लोकसभेच्या १० जागा आहेत. सध्या या १० जागांपैकी भाजपच्या ताब्यात ७ जागा आहेत. हरयाणा हा कधी काँग्रेसचा गड होता. मात्र २०१४ साली मोदी लाटेत तो भाजपकडे केला. काँग्रेसला फक्त १ जागा मिळाली. माजी मुख्यमंत्री भुपेंद्र हुडा यांचा मुलगा दिपेंद्र हुडा हे एका मतदार संघातून निवडून आले. या राज्यात जाटांची संख्या मोठी आहे. हे जाट ज्या पक्षाला मतदान करतात तो जिंकून येतो हा इतिहास आहे. २०१४ साली लोकसभा निवडणुकीपूर्वी युपीए सरकारने जाटांना ओबीसीचा दर्जा दिला होता.

मात्र सुप्रीम कोर्टाने तो नाकारला. त्यानंतर केंद्रातील नव्या सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जाट नेत्यांना भेटले. त्यावेळी आरक्षणाबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन मोदींनी त्यांना दिले होते. मात्र तोडगा काही निघाला नाही. त्यामुळे जाटांनी आंदोलन केले ते हिंसक ठरले. यावेळी जाटांना कोणता पक्ष काय आश्वासन देतो आणि ते आश्वासन कसे निभावतो, यावर हे राज्य कोणाच्या बाजूने उभे रहाणार हे ठरणार आहे. याशिवाय डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहिम याच्या भक्तांनी आंदोलन केले होेते. त्यात ३१ जण ठार झाले होते. रहिमने जाहीररित्या भाजपला पाठिंबा दिला होता. राज्यात आम आदमी पक्षाने काँग्रेस आणि नव्याने स्थापन झालेल्या जननायक जनता पार्टी यांच्यासोबत युती केली आहे. तसेच बहुजन समाज पक्षही हरयाणात आठ जागा लढणार आहे. लोकतांत्रिक सुरक्षा पार्टीसोबत त्यांनी युती केली आहे.

लोकसभेचे मतदार संघ
१ -अंबाला, २- भिवनी महेंद्रगड, ३ – फरिदाबाद, ४ -गुरगाव, ५ -हिसार, ६ – कर्नाल, ७ -कुरुक्षेत्र, ८ – रोहतक, ९ -सिरसा, १० -सोनीपत.

२०१४ सालचे राज्यातील बलाबल
काँग्रेसचा पारंपारिक गड असलेल्या हरियाणामध्ये भाजपने २०१४ साली चमत्कार घडवला. देशभरात आलेल्या मोदी लाटेचा परिणाम हरयाणातही दिसून आला. भाजपला त्यावेळी ७ जागा मिळाल्या. तर ओमप्रकाश चौताला यांच्या इंडियन नॅशनल लोक दल या पक्षाला २ जागा मिळाल्या. काँग्रेसला फक्त १ जागा मिळाली होती.

निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे
१) राज्यातील जातीय राजकारण, जाट समाजाला ओबीसीचा दर्जा
२) राज्यतील भाजप सरकारची कामगिरी
३) राज्यातील बेरोजगारी
४) सतलज यमुना लिंक कालवा
५) राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती, विशेषत: महिलांची सुरक्षा

राज्यातील मतदार
हरयाणात एकूण १ कोटी ७४ लाख ४८ हजार २९३ मतदार आहेत. २०१४ सालच्या तुलनेत मतदारांमध्ये तब्बल १० लाखांची वाढ झाली आहे. हे १० लाख मतदार १८ ते २० वर्षे वयोगटातील आहेत. एकूण मतदारांपैकी ८० लाख ५१ हजार १४० मतदार महिला आहेत. तर ९३ लाख ९७ हजार १५३ मतदार हे पुरुष आहेत.

First Published on: April 4, 2019 4:26 AM
Exit mobile version