‘…नाहीतर परिणामांसाठी तयार राहा’; चीफ ऑफ डिफेन्स बिपीन रावत यांचा लोकांना इशारा!

‘…नाहीतर परिणामांसाठी तयार राहा’; चीफ ऑफ डिफेन्स बिपीन रावत यांचा लोकांना इशारा!

तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी दिली इशारा!

देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस नवनवे टप्पे गाठत असताना काही देशवासीय मात्र लॉकडाऊन आणि संचारबंदीचे नियम पाळताना दिसत नाहीयेत. विनाकारण किंवा अनावश्यक कारणांसाठी अजूनही मोठ्या संख्येनं लोकं घराबाहेर पडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताच्या तिन्ही सेनादलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांनी देशवासियांना धोक्याचा इशारा दिला आहे. ‘येत्या १४ एप्रिलपर्यंत आपण कोरोनाच्या (Covid-19) संसर्गाची साखळी तोडलीच पाहिजे. या लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून आपण हे साध्य करायला हवं. नाहीतर मग आपण कोरोनाच्या भयंकर साथीमुळे पुढे उभ्या ठाकणाऱ्या गंभीर परिणामांसाठी तयार राहायला हवं’, असं बिपीन रावत म्हणाले आहेत. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना त्यांनी हे सांगितलं.

प्रिपेर ऑर सफर…!

भारतीयांना सतर्क करताना रावत यांनी लष्कराच्या एका वाक्याचा आधार घेतला आहे. ‘लष्करात आम्ही म्हणतो प्रिपेर ऑर पेरिश. म्हणजे तयार राहा किंवा नष्ट व्हा. पण सध्याच्या काळाच आम्ही त्यातून नवीन वाक्य बनवलं आहे. प्रिपेर ऑर सफर. म्हणजे तयार राहा किंवा यातना सहन करा. आपण १०० टक्के लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायलाच हवं. पेरणीचा हंगाम समोर येत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणं आपल्याला परवडणार नाही. सरकारकडून आणि देशातल्या जनतेकडून जी कुठली मागणी केली जाईल, ती पूर्ण करण्यासाठी लष्कर तयार आहे’, असं बिपीन रावत यांनी नमूद केलं.

लष्कराने उभारली १८ रुग्णालयं!

यावेळी रावत यांनी लष्कराच्या तयारीविषयी देखील माहिती दिली. ‘आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स पूर्ण तयारीत असून संभाव्य कोरोनाग्रस्तांसाठी १७ ते १८ रुग्णालयं लष्करानं तयार केली आहेत. देशाच्या अगदी दुर्गम भागात देखील ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातून १५ हजार बेडची सोय तयार आहे. याशिवाय जैसलमेर, जोधपूर आणि झाशीमध्ये प्रत्येकी ५०० बेडच्या क्वॉरंटाईन सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या आर्मी पब्लिक स्कूलचा परिसर देखील क्वॉरंटाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वापरायची आमची तयारी आहे. या प्रत्येक शाळेत किमान २०० रुग्णांना क्वॉरंटाईन करता येऊ शकेल’, असं रावत यावेळी म्हणाले.

भितीयुक्त आशावाद…!

बिपीन रावत यांनी यावेळी भारत कोरोनाचा यशस्वीपणे लढा देईल असा विश्वास व्यक्त केला. मात्र, ‘सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाऊन आणि भारतातला उन्हाळा या गोष्टींनी कोरोनाचा पाडाव करायला हवा’, असा भितीयुक्त आशावाद व्यक्त करायला देखील ते विसरले नाहीत.


Corona:५ एप्रिलला रात्री ९ वाजता तुमची ९ मिनिटं मला द्या! – पंतप्रधान नरेंद्र मोदी
First Published on: April 3, 2020 12:02 PM
Exit mobile version