‘जनगणना – २०२१’ ची तयारी सुरु; ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये ‘प्री-टेस्ट’

‘जनगणना – २०२१’ ची तयारी सुरु; ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये ‘प्री-टेस्ट’

‘जनगणना - २०२१’ ची तयारी सुरु

भारताच्या ‘जनगणना २०२१’ च्या पूर्वतयारी अंतर्गत जनगणनेच्या सर्व टप्प्यांची रंगीत तालीम (प्रीटेस्ट) ऑगस्ट ते सप्टेंबर २०१९ दरम्यान देशातील निवडक जिल्ह्यांमधील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये होणार आहे. या जनगणनेमध्ये पहिल्यांदाच माहितीचे संकलन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून त्याची चाचणी ‘प्रीटेस्ट’ मध्ये होणार आहे.

जनगणना २०२१ ची तयारी सुरु

भारताच्या महानिबंधक तथा जनगणना आयुक्त, नवी दिल्ली यांच्या कार्यालयामार्फत देशाच्या सर्वात मोठ्या प्रशासकीय कामाची म्हणजेच जनगणना २०२१ ची तयारी सुरु झाली आहे. येणाऱ्या जनगणनेसाठी माहिती संकलनाच्या पद्धतीमध्ये क्रांतीकारक बदल प्रस्तावित आहेत. त्या अनुषंगाने जनगणना आयुक्त, नवी दिल्ली कार्यालयाने ३ ते ११ जून या कालावधीत पुणे येथील यशदामध्ये राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन महाराष्ट्राच्या जनगणना संचालक रश्मी झगडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

ऑनलाईन पद्धतीने होणार माहितीचे संकलन

राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांनी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि गोवा राज्यांमधील प्रशिक्षकांना यशदा येथे प्रशिक्षण दिले. हे राज्यस्तरीय प्रशिक्षक पुढील टप्प्यात जिल्हास्तरीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी राज्यस्तरीय प्रशिक्षकांनी पुणे जिल्ह्यातील निवडक ग्रामीण आणि शहरी भागात चाचणीसाठी माहिती संकलन केले. दरम्यान, प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी झगडे यांनी ‘प्रीटेस्ट’ ही जनगणनेची रंगीत तालीम असल्याने त्यातील प्रत्येक टप्प्यात बिनचूक काम झाल्यास प्रत्यक्ष जनगणनेची प्रश्नावली, सूचना पुस्तिका, माहिती संकलनाची पद्धती आणि माहिती संस्कारणाची पद्धती सुनिश्चित करणे शक्य होईल, असे प्रतिपादन केले.

जनगणना २०२१ साठी ‘प्रीटेस्ट’ अत्यंत महत्वाचा टप्पा असून जनगणना २०२१ मध्ये पहिल्यांदाच माहितीचे संकलन ऑनलाईन पद्धतीने करण्याचे प्रस्तावित असून त्याची चाचणी ‘प्रीटेस्ट’ मध्ये होणार आहे. जनगणना २०२१ मध्ये माहितीचे संकलन ऑनलाईन पद्धतीने झाल्यास शासकीय धोरण ठरविण्यासाठी आणि संशोधकांना आवश्यक जनगणनेची माहिती प्राधान्याने उपलब्ध होऊ शकेल.  विवेक जोशी, भारताचे महानिबंधक तथा जनगणना आयुक्त


हेही वाचा – ‘आधी मतदान करा, मग सुट्टीचा आनंद घ्या’; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


 

First Published on: June 14, 2019 5:51 PM
Exit mobile version