रविवारी रात्री ९ वाजता देशभरात लाईट बंद झाली तर काय? केंद्र सरकार असं करणार नियोजन!

रविवारी रात्री ९ वाजता देशभरात लाईट बंद झाली तर काय? केंद्र सरकार असं करणार नियोजन!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातल्या नागरिकांना येत्या ५ एप्रिल रोजी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातले सगळे दिवे बंद ठेऊन बाल्कनीमध्ये किंवा दरवाजात दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. दिवे, टॉर्च, मेणबत्ती किंवा मोबाईल फ्लॅश लावण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, यावर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आक्षेप घेत यामुळे वीज उत्पादन आणि पुरवठा याचं गणित बघडून ग्रीड फेल होऊ शकते, असं म्हटलं. इतरही काही राज्यांनी अशाच प्रकारचा आक्षेप घेतला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने एक परिपत्रक काढून त्यासंदर्भातलं नियोजन पूर्ण
झाल्याचं जाहीर केलं आहे.

एकाच वेळी एकदम विजेची मागणी कमी झाली, तर देशभरात जोडलेल्या पॉवर ग्रीडवर लोड येऊ शकतो असा दावा नितीन करीर यांनी केला होता. मात्र, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने यावर परिपत्रक काढून स्पष्टीकरण दिलं आहे. ‘नॅशनल लोड डिस्पॅच सेंटरने ९ वाजता ९ मिनिटांसाठी अचानक कमी होणाऱ्या विजेच्या मागणीच्या व्यवस्थापनाचं नियोजन केलं आहे. आता त्यानुसार प्रत्येक राज्यातल्या रिजनल आणि स्टेट लोड डिस्पॅच सेंटरला ते स्वतंत्रपणे कळवण्यात येईल’, असं या पत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, या ९ मिनिटांमध्ये काय बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे त्याविषयी देखील या पत्रकात उल्लेख करण्यात आला आहे. ‘या काळामध्ये रस्त्यावरचे दिवे, टीव्ही, फ्रीज, एसी बंद करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आलेलं नाही. याशिवाय, हॉस्पिटल आणि इतर जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या ठिकाणी देखील लाईट चालूच ठेवता येणार आहे. फक्त घरातले दिवे बंद करण्याचा उल्लेख आवाहनामध्ये करण्यात आला आहे’, असं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

First Published on: April 4, 2020 8:40 PM
Exit mobile version