आता भारतातही चार दिवसांचा आठवडा!

आता भारतातही चार दिवसांचा आठवडा!

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नवीन कामगार नियम लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. नवीन कामगार नियम लागू झाल्यानंतर देशातील कंपन्यांना आपल्या कर्मचार्‍यांना आठवड्यातील चार दिवस कामावर बोलवण्याची मूभा असेल. म्हणजेच हे नियम लागू झाल्यानंतर परदेशाप्रमाणे भारतातही चार दिवसांचा आठवडा सुरू करता येईल. त्याप्रमाणे कंपन्यांना राज्यस्तरीय विमा कंपन्यांकडून कर्मचार्‍यांची मोफत आरोग्य तपासणी करून घेण्याची मूभाही देण्यात येईल.

मात्र, चार दिवसांचा आठवडा म्हणजेच आठवड्यातून चारच दिवस काम करण्याची सवलत देण्यात आली तरी आठवड्यात किमान ४८ तास काम करणे बंधनकारक असणार आहे. म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास आठवड्यातील चार दिवस काम करून तीन दिवस सुट्टी हवी असेल तर दिवसाला १२ तासांची शिफ्ट करावी लागणार आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव अपूर्वी चंद्रा यांनी सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली.

अपूर्वी चंद्रा यांनी, आम्ही कामावर ठेवणार्‍या कंपन्या किंवा कर्मचार्‍यांवर दबाव आणू इच्छित नाही. त्यांना जो पर्याय योग्य वाटेल तो निवडण्याची मूभा त्यांना देण्यात आली आहे. कामाची बदलणारी पद्धत पाहून ही नवीन व्यवस्था उभारली जात आहे. आम्ही काही बदल करण्याचे प्रयत्न केले आहेत. कामाच्या दिवसांसंदर्भात आम्ही काही सवलती देण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती दिली. नवीन नियमांप्रमाणे तयार करण्यात आलेल्या नियमांचा कच्चा मसुदा तयार असून अंतिम मसुदा लवकर तयार होईल असा विश्वास चंद्रा यांनी व्यक्त केला आहे. हा मसुदा तयार करण्यामध्ये अनेक मोठ्या राज्यांनी हातभार लावल्याचेही चंद्रा यांनी स्पष्ट केले.

कर्मचार्‍यांसाठी आठवड्यामधील कामाचे दिवस हे पाच दिवसांपेक्षा कमी होऊ शकतात. चार दिवस काम केले तर तीन दिवस सुट्टी दिली जाईल. यापूर्वीही आठवड्यामध्ये किमान ४८ तास काम केले जावे अशी अट होती आणि ती आताही कायम ठेवण्यात आली आहे. कर्मचारी आणि कंपन्या या दोघांची सहमती असेल तर हे लागू करता येईल. मात्र, हा नियम लागू केलाच पाहिजे असे कोणतेही बंधन नसणार, असेही चंद्रा यांनी सांगितले आहे.

First Published on: February 10, 2021 7:43 AM
Exit mobile version