कांद्याची आयात करणं ही केंद्र सरकारची चूक – शरद पवार

कांद्याची आयात करणं ही केंद्र सरकारची चूक – शरद पवार

कांद्याचे गगनाला भिडलेल्या दरामुळे काही दिवसांपूर्वीच संसदेत गदारोळ सुद्धा झाला. यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया देली आहे. सरकारच्या कांदा आयात करण्याच्या निर्णयाला चुकीचे म्हणत कांद्याच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असल्याची टिका त्यांनी सरकारवर केली आहे. दि इंडियन एक्स्प्रेस या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी राज्यातील सत्तांतर, महाविकास आघाडीच्या स्थापनेसह कांद्याची दरवाढ याविषयी संवाद साधला.

काय म्हणाले शरद पवार?

कांद्याची दरवाढ तसेच त्याबाबत सरकारची भूमिका यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, “तीन ते चार महिन्यांपूर्वी जेव्हा शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला तेव्हा केंद्र सरकारने कांद्याला चांगला भाव दिला नाही. परिणामी पुढील हंगामात शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दुसऱ्या पिकांकडे वळवला. त्यामुळे आता आपल्याला तुर्कीतून कांदा आयात करावा लागत आहे. कांदा आयातीचा केंद्राचा निर्णय चुकीचा असून तीन महिन्यांपूर्वीच मी केंद्र सरकारला या विषयी पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात मी केंद्राला पुढे काय घडेल? असा इशारा दिला होता,” असं पवार यांनी सांगितले.

तडजोड करावीच लागते

कांदा दरवाढी प्रश्नाबरोबरच शरद पवार यांनी मुलाखतीत महाविकास आघाडीबाबत प्रश्नावरपण बोलते झाले. ते म्हणाले की, “एकत्र येऊन काम करायचे असते तेव्हा तडजोडीशिवाय पर्याय नसतो. महाविकास आघाडीच्या बाबतीत म्हणाल तर इथे फक्त शिवसेनेलाच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसलासुद्धा तडजोड करावी लागली आहे. कोणतंही सरकार घटनेचा आदर करते. त्यामुळे शिवसेनेनेसुद्धा घटनेचा आदर राखत तडजोड स्वीकारली. सुरुवातीला दोन पक्षांनीच सरकार चालवण्यावर चर्चा सुरू होती. पण त्यावेळी शिवसेनेला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद विभागून देण्याचा विचार होता. पण, शिवसेनेला ५ वर्षांचं मुख्यमंत्रिपद हवं असल्यानं आम्हीसुद्धा होकार दिला. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी केवळ शिवसेनेनेच नव्हे तर आम्हीसुद्धा तडजोडी स्वीकारल्या आहेत, असे सुद्धा शरद पवार यावेळी म्हणाले.

First Published on: December 8, 2019 1:28 PM
Exit mobile version