बंडखोर आमदारांना केंद्राची ‘वाय प्लस’ सुरक्षा

बंडखोर आमदारांना केंद्राची ‘वाय प्लस’ सुरक्षा

एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेशी बंडखोरी करून गुवाहाटीमध्ये थांबलेल्या शिवसेना आमदारांपैकी काहींच्या कार्यालयांची तोडफोड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जवळपास १५ बंडखोर आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात शिवसैनिक आक्रमक झाले असून अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरून निदर्शने करीत आहेत. यामध्येच सेनेच्या अनेक बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या पोस्टरवर काळेही फासण्यात आले. शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयांमध्ये तोडफोडीच्या घटना समोर आल्या आहेत.

सोबतच आमदार सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे अशा काही आमदारांच्या कार्यालयांना शिवसैनिकांनी लक्ष्य केले आहे. पोलिसांकडूनही या बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना दिलेली सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हणत केंद्राच्या गृह सचिवांना सुरक्षा मिळण्यासाठी पत्र लिहिले होते. त्यानुसार केंद्राने ही सुरक्षा दिल्याचे म्हटले जात आहे.

राज्याचे पोलीस महासंचालकांना पत्र
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही चार्ज झाले आहेत. त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना पत्र लिहिले आहे. शिंदे गटातील ३८ सेना आमदार, प्रहार जनशक्ती पक्षाचे २ आणि ७ अपक्ष आमदारांची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची पोलीस सुरक्षा चुकीच्या पद्धतीने काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा पूर्ववत करावी, असे कोश्यारी यांनी पत्रात म्हटले आहे.

First Published on: June 26, 2022 10:49 PM
Exit mobile version