बॅलेट नाही ‘ईव्हीएम’च; राज ठाकरेंच्या मागणीला निवडणूक आयोगाचा खो

बॅलेट नाही ‘ईव्हीएम’च; राज ठाकरेंच्या मागणीला निवडणूक आयोगाचा खो

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा

मनसेप्रमुख राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएमच्या विरोधात राण उठवत आहेत. सर्व विरोधी पक्षांची जमवाजमव करुन त्यांनी काही दिवसांपूर्वी सयुंक्त पत्रकार परिषदही घेतली होती. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन त्यांनी ईव्हीएमच्या विरोधात विधायक लढा उभा करत असल्याचे सांगितले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील ईव्हीएमच्या विरोधात दंड थोपटत आहेत. मात्र मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी ईव्हीएमऐवजी बॅलेट बॉक्सवर मतदान घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. बॅलेट पेपर आता भुतकाळात जमा झाला असून यापुढे निवडणुका या ईव्हीएमवरच होणार असल्याचे अरोरा यांनी सांगितले.

मुख्य निवडणूक आयुक्त हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना कोलकाता विमानतळावर काल त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा हवाला देत सांगितले की, बॅलेट पेपर हा भूतकाळ असल्याचे खुद्द सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे. त्यामुळे बॅलेटच्या काळात पुन्हा जाण्यास काहीही अर्थ नाही. त्यामुळे पुन्हा बॅलेटवर निवडणूक होईल, याची कोणतीही सूतराम शक्यता नसल्याचे अरोरा यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूक सुरु होण्याच्या आधीपासूनच आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू हे ईव्हीएमच्या विरोधात प्रचार करत होते. देशभर विरोधी पक्षातील नेत्यांची गाठभेट घेऊन त्यांनी आपला आवाज सशक्त करण्याचा प्रयत्न केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर सर्व विरोधकांचा सुपडा साफ झाला. त्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे, ममता बॅनर्जी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी करत आहेत.

First Published on: August 10, 2019 1:38 PM
Exit mobile version