Lockdown: लहानग्यांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या, ११ दिवसांत ९२ हजार तक्रारी!

Lockdown: लहानग्यांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या, ११ दिवसांत ९२ हजार तक्रारी!

पिडीत आणि अडचणीत सापडलेल्या मुलांना चाइल्ड लाइन देवदूतासारखी ठरते.

देशभरात २४ मार्चपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन १४ एप्रिलला संपत असून तो पुढे वाढवण्याच्या हालचाली सध्या केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू आहेत. पण हा लॉकडाऊन देशभरातल्या लहानग्यांसाठी धक्कादायक आणि धोकादायक ठरू लागला आहे. या काळात लहानग्यांवर अत्याचार झाल्याच्या ९२ हजारांहून जास्त तक्रारी चाईल्ड लाईन इंडिया या हेल्पलाईनवर आल्या आहेत. या हेल्पलाईनच्या प्रमुख हरलीन वालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार २४ मार्च ते ३१ मार्च या कालावधीमध्ये चाईल्डलाईन १०९८ या लहान मुलांसाठीच्या हेल्पलाईनवर देशभरातून ३ लाख ७ हजार तक्रारी दाखल झाल्या. त्यातल्या जवळपास ३० टक्के मुलांनी म्हणजेच तब्बल ९२ हजार १०५ मुलांनी अत्याचार आणि हिंसेच्या तक्रारी केल्या आहेत. अमर उजालाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

५० टक्के बालशोषणाच्या तक्रारी वाढल्या!

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात बालकांवरच्या अत्याचाराच्या आणि हिंसेच्या घटनांच्या तक्रारींमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती वालिया यांनी दिली आहे. याव्यतिरिक्त या हेल्पलाईनवर आलेल्या इतर तक्रारींमध्ये ११ टक्के तक्रारी शारिरीक स्वास्थ्य, ८ टक्के तक्रारी बालमजुरी, ८ टक्के तक्रारी मुलं पळून जाण्याच्या तर ५ टक्के तक्रारी मुलं बेघर होण्याच्या आहेत. याव्यतिरिक्त १६७७ कॉल हे कोरोना व्हायरसशी संबंधित प्रश्नांसाठीचे आहेत. त्यासोबत २३७ लोकांनी आपल्या आजारपणाविषयी सांगून मदतीची विनंती केली.

महिला अत्याचाराच्याही २५७ तक्रारी

याशिवाय लॉकडाऊनच्या काळात महिलांविरोधातल्या घरगुती हिंसाचाराच्या घटना देखील वाढल्या असून ११ दिवसांमध्ये अशा प्रकारच्या तब्बल २५७ तक्रारी दाखील झाल्या आहेत. त्यापैकी ६९ तक्रारी या इमेलवरून मिळाल्या आहेत. अजूनही मोठ्या प्रमाणावर अशा घटना घडल्या असतील. मात्र, महिला सामान्यपणे तक्रारींसाठी पुढे येत नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी अमर उजालाला दिली आहे.

First Published on: April 9, 2020 6:12 PM
Exit mobile version