चीनी सैनिकांकडून जवानांच्या मृतदेहाची विटंबना

लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय व चीनी सैनिकांमध्ये झालेल्या हिसंक संघर्षानंतर तणावाचे वातावरण आहे. या हिंसक झटापटीत शहीद झालेल्या जवानांचे छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडल्याने इतर जवानांमध्ये संतापाचा भडका उडाला आहे. जवानांच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याने बुधवारी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी हा संघर्ष झाला त्या पेट्रॉलिंग पॉईंट-१४ च्या बटालियनबरोबर संवाद साधत त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असेही आश्वासन यावेळी जवानांना देण्यात दिले. त्यानंतर येथील परिस्थिती थोडी निवळली. तसेच दोन्ही देशाच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेबद्दलही जवानांना माहिती देण्यात आली.

दरम्यान, दोन्ही देशातील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतरही चीनने गलवान खोऱ्यात सैनिकांची जमवाजमव सुरू केली आहे. यावर लेह कॉर्प्स कमांडर लक्ष ठेवून आहेत. तर दुसरीकडे गरज भासल्यास लेफ्टनंट जनरलस्तरावर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीनकडून सद्यपरिस्थितीवर अधिक चर्चा करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पण यात नेमक्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. यादरम्यान, लष्करातर्फे लडाखमधील पैंगोंग त्सो येथे परिस्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सोमवारी रात्री भारतीय व चीनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात चीनी सैनिकांनी खिळे असलेल्या लोखंडी रॉड व दगडाने जवानांवर हल्ला केला होता. यात २० जवान शहीद झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत.

First Published on: June 18, 2020 12:10 PM
Exit mobile version