कायदा लागू करण्याचा निर्णय योग्यच

कायदा लागू करण्याचा निर्णय योग्यच

कालपर्यंत पाकिस्तानकडून जे काम केले जात होते, ते आता काँग्रेस करत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून काँग्रेसने ज्या पद्धतीने देशात आग लावण्याचे काम केले आहे, त्यावरून नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्याचा आमचा निर्णय हजार टक्के योग्यच होता हे सिद्ध झाले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे सांगितले. झारखंडच्या दुमका येथे आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक रॅलीला पंतप्रधान संबोधित करत होते.

केंद्र सरकारने संसदेत मंजूर करून घेतलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून सध्या देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांकडून या विधेयकाला विरोध होत असतानाच देशातील विविध राज्यांमध्ये या विधेयकाविरोधात हिंसक आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत प्रथमच जाहीरपणे भाष्य केले आहे.

कालपर्यंत देशाला बदनाम करण्याचे जे काम पाकिस्तान करायचा ते आता काँग्रेसकडून करण्यात येत आहे, असा आरोप मोदींनी केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून काँग्रेस आणि त्यांचे सहकारी वाद निर्माण करत आहेत. त्यांना म्हणावे तसे यश मिळत नसल्याने जाळपोळ करत आहेत. मात्र ही जाळपोळ करणारे कोण आहेत, हे त्यांनी घातलेल्या कपड्यांवरून समजून येत आहे, असा टोला मोदींनी लगावला.

कलम 370, राम जन्मभूमीबाबत पाकिस्तानने लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर आंदोलन केले होते. आता काँग्रेस पाकिस्तानचीच री ओढत आहे, असा आरोपही मोदींनी केला.

First Published on: December 16, 2019 5:26 AM
Exit mobile version