राजू श्रीवास्तव यांच्यासाठी पुढील ७२ तास महत्वाचे, तब्येतीत किंचित सुधारणा, आयसीयूमध्ये बहीणीने बांधली राखी

राजू श्रीवास्तव यांच्यासाठी पुढील ७२ तास महत्वाचे, तब्येतीत किंचित सुधारणा, आयसीयूमध्ये बहीणीने बांधली राखी

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत किंचित सुधारणा झाली असून अजूनही ते व्हेटिलेटरवर आहेत. मात्र पुढील ७२ तास त्यांच्यासाठी महत्वाचे असल्याचे एम्स रुग्णालयातर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान गुरुवारी रक्षाबंधनदिनी राजू यांना त्यांच्या बहीणीने ICU मध्येच राखी बांधून त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

दोन दिवसांपूर्वीच राजू श्रीवास्तव गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना भेटण्यासाठी दिल्लीत आले होते. तेथे ते एका हॉटेलमध्ये थांबले होते. १० ऑगस्ट रोजी सकाळी हॉटेलच्या जीममध्ये वर्कआऊट करताना अचानक ते खाली कोसळले. बेशुद्धावस्थेतच त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या हृदयात १०० टक्के ब्लॉकेजेस आढळल्याने त्यांच्यावर तातडीने अॅजियोप्लास्टी आणि अॅजियोग्राफी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्याचवेळी त्यांच्या मेंदूमध्ये गुंतागुत निर्माण झाली . तसेच त्यांचे पल्स रेटही ६०-६५ च्या मध्ये होता. तेव्हापासून ते आयसीयूत असून व्हेंटिलेटरवर आहेत. गुरुवारी रात्री उशीरा त्यांनी पायाची हालचाल केली तसेत हाताच्या बोटांचीही हालचाल केली. यामुळे हे चांगले लक्षण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र तरीही पुढील तीन दिवस म्हणजेच ७२ तास हे राजू यांच्यासाठी महत्वाचे आहेत. डॉक्टरांच्या एका पथकाच्या निगराणीखाली राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राजू श्रीवास्तव हे देशातील लोकप्रिय कॉमेडियन असून त्यांचा मोठा चाहतावर्गही आहे. यामुळे त्यांच्या दिर्घायुष्यासाठी चाहते पूजा अर्चा होम होवनही करत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजू यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या संपर्कात असून राजू यांच्या तब्येतीची अपडेट घेत आहेत.

First Published on: August 12, 2022 2:43 PM
Exit mobile version