खेळाडूंची अटलजींना श्रद्धांजली

खेळाडूंची अटलजींना श्रद्धांजली

अटलबिहारी वाजपेयी

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी निधन झालं. ११ जूनपासून गेले दोन महिने अटलजी हॉस्पिटलमध्ये होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. दिल्लीतील एम्स हॉस्पिटलनं गुरूवारी संध्याकाळी ५.०५ मिनिटांनी ही बातमी प्रसिद्ध केली. त्यानंतर जगभरातील प्रत्येक क्षेत्रातून दुःख व्यक्त केलं गेलं. भारतातील प्रसिद्ध खेळाडूंनीदेखील अटलजींना ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे. क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोडपासून ते सचिन तेंडुलकर या सर्वच खेळाडूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

खेळाडूंचं ट्विट आणि भावना

‘आकाशासारख्या माणूस आकाशात सामावला, मातीसारखा मऊ असणारा मातीत मिसळून गेला. जीवनात कोण अटल राहीलं आहे, मात्र अटल राहून त्यानं आयुष्य जिंकलं! ओम शांती! अटल बिहारी वाजपेयीजी,’ अशा भारलेल्या शब्दात क्रिकेटर विरेंद्र सेहवागनं ट्विट केलं आहे.

तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं ‘आज खूपच मोठं नुकसान झालं आहे. अटल बिहारी वाजपेयी हे आपल्या देशासाठी एक मोठं योगदान होते. त्यांच्या चाहत्यांसाठी माझ्याकडून प्रार्थना,’

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता विजेंद्रर सिंहनं म्हटलं आहे, ‘देशाचे महान पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आपल्यात आता नाहीत. एक दूरदर्शी, एक कवी, एक राजनेता, लाखो लोकांचं मन जिंकणारे अशी व्यक्ती. बाकी काही तर फक्त सन्मानाचे ते हक्कदार आहेत. मातृभूमीसाठी त्यांचं असलेलं योगदान पुढच्या पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील.’

बुद्धीबळात पाचवेळा विश्वविजेता ठरलेल्या विश्ननाथन आनंदनं ‘भारतानं एक महान नेता गमावला. ‘जेंटल जायंट’ हेच एकमेव नाव त्यांच्यासाठी योग्य आहे आणि त्यांना लक्षात ठेवण्यासाठीदेखील योग्य आहे. मनापासून मी त्यांच्यासाठी भावना व्यक्त करत आहे,’ असं ट्विट केलं आहे.

माजी क्रिकेटर आणि भारतीय टीमचे माजी कोच अनिल कुंबळेनं, ‘देशासाठी अतिशय वाईट दिवस आहे कारण आपण आपल्या महान नेत्याला गमावलं आहे. देशाच्या वाटचालीमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं खूप मोठं योगदान होतं. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो,’ अशी भावना व्यक्त केली आहे.

क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनीदेखील ट्विट करत, ‘आपल्या वचनाला जागणारे, वचन आणि ध्येयामध्ये ‘अटल’ असे अटलजी आपल्यात नाही राहिले. पोखरण असो वा कारगिल, राष्ट्रनिर्मितीमध्ये अटलजींचं योगदान आणि सम्मान नेहमीच करण्यात येईल. नेता आणि जनता या दोघांच्याही मनात अटलजी कायम राहतील. त्यांचं निधन हे देशाचं खूप मोठं नुकसान आहे,’ असं म्हटलं आहे.

तर माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मणनं सोशल मीडियावर म्हटलं आहे, ‘भारताचे सर्वात प्रिय पंतप्रधान, एक महान कवी आणि अद्भुत नेत्यांपैकी एक. अटल बिहारी वाजपेयीजी तुम्हाला आम्ही एक राष्ट्राच्या रूपात नेहमीच आठवत राहू. तुमच्या चाहत्यांसाठीही माझी प्रार्थना.’

दरम्यान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळं देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

First Published on: August 17, 2018 3:04 PM
Exit mobile version