बांगलादेशी घुसखोरीसंदर्भात काँग्रेसने आपली भूमीका स्पष्ट करावी – अमित शहा

बांगलादेशी घुसखोरीसंदर्भात काँग्रेसने आपली भूमीका स्पष्ट करावी – अमित शहा

आसाममधील एनआरसीच्या मुद्द्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काँग्रेसवर आणि ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने बांगलादेशी घुसखोरीसंदर्भात आपली भूमीका स्पष्ट करावी असे अमित शहा यांनी सांगितले आहे.

४० लाख नागरिकांची नावे काढण्यात आली

एनआरसीमधून ४० लाख नागरिकांना अवैध घोषीत करण्यात आले आहे. ज्या लोकांची एनआरसीमधून नावं काढून टाकण्यात आली आहेत ते भारतीय नसल्याचे अमित शहा यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले आहे. प्राथमिक तपासामध्ये ते भारतीय नसून घुसखोर असल्याचे समोर आले आहे. जे नागरिक भारतीय असल्याचे स्पष्ट करु शकले नाही त्यांची नावं एनआरसीमधून काढून टाकण्यात आले आहेत. कोणावर देखील अन्याय होणार नसल्याचे अमित शहा यांनी सांगितले आहे.

काँग्रेस जनतेचे लक्ष विचलित करतेय

काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने भाजप जनतेसोबत धोका करत करत असल्याचे म्हटले आहे. वास्तविकता वेगळी आहे. मात्र काँग्रेसकडून जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम सुरु आहे. ४० लाखांचा आकडा हा अंतिम आकडा नसल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. कोणत्याही भारतीय नागरिकावर अन्याय केला जात नाही. ज्या लोकांना भारतीय नागरिक असल्याचे स्पष्ट करता आले नाही त्यांचीच नावे काढण्यात आली आहेत.

काँग्रेसला वोटबँक महत्वाची आहे

घुसखोरीमुळे आसाममधील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर १४ ऑगस्ट १९८५ रोजी आसाम अकॉर्ड साइन केले गेले. त्यावेळी देशाचे पंतप्रधान राजीव गांधी होते. अकॉर्डनुसार एनआरसी बनवताना एक-एक घुसखोरांना बाहेर काढले जाईल. २००५ साली काँग्रेसने एनआरसी बनवण्याचा प्रयत्न केला होता. घुसखोऱ्यांना बाहेर काढण्याचा हिंमत काँग्रेसमध्ये नव्हती. कारण त्यांना वोटबँक महत्वाची होती असा आरोप अमित शहा यांनी केला आहे. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आणि मोदी सरकारने एनआरसी बनवण्याचे काम सुरु केले. एनआरसीची जी यादी जाहीर झाली आहे ती प्राथमिक यादी आहे. त्या यादीची पडताळणी, तपासणी आणि सुनावणी होईल त्यानंतर अंतिम यादी जाहीर होईल असं देखील त्यांनी सांगितले.

भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी एनआरसी

घुसखोरीमुळे आसामधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाममधील लोकांचे रोजगार, शिक्षणाचे अधिकार हिस्कावले जात आहे. त्यांना मानवाधिकारी नाही का असा सवाल यावेळी त्यांनी केला. भारतीय नागरिकांच्या मानवाधिकाराच्या सुरक्षिततेसाठीच एनआरसी बनवण्यात आली आहे. घुसखोरीमुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे. बांगलादेशी घुसखोरीसंदर्भात काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने आपली भूमीका स्पष्ट करावी. तसंच सर्व पक्षाने देखील याबद्दलची भूमीका स्पष्ट करावी असे शहा यांनी सांगितले.

ममता बॅनर्जींनी स्वत:च्या ज्ञानात भर टाकावी

आसाममध्ये भारतातील कोणतेही नागरिक राहू शकतात. रोजगारासाठी किंवा अन्य काही कारणासाठी जर दुसऱ्या देशातून कोणी येत असेल तर ती घुसखोरीच झाली. विरोधकांकडून मुद्दाम वाद लावण्याचे काम सुरु असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. काँग्रेसची सत्ता असल्यावर एक भूमीक असते आणि विरोधी पक्षात असल्यावर दुसरी भूमिका असते. काँग्रेसला भूमिका बदलण्याची सवयी आहे. ममता बॅनर्जी यांनी स्वत:च्या ज्ञानात भर टाकावी. गृहयुध्द म्हणजे काय हे ममता बॅनर्जीने यांनी स्पष्ट करावे असं अमित शहा यांनी म्हटले आहे.

First Published on: July 31, 2018 5:56 PM
Exit mobile version