पंतप्रधान मोदींनंतर राहुल गांधींची ‘मन की बात’; लवकरच पॉडकास्ट सुरू करणार

पंतप्रधान मोदींनंतर राहुल गांधींची ‘मन की बात’; लवकरच पॉडकास्ट सुरू करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ नंतर आता कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी लवकरच त्यांची ‘मन की बात’ व्यक्त करणार असल्याची चर्चा सुरु आहे. राहुल गांधी येत्या काळात पॉडकास्टद्वारे त्यांची ‘मन की बात’ व्यक्त करणार असल्याची शक्यता आहे. कॉंग्रेसच्या एका नेत्याने सांगितलं की आम्ही आता नियोजनाच्या टप्प्यावर आहोत. आम्ही यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेत असल्याचं या काँग्रेस नेत्यानं म्हटलं आहे. याबाबतची माहिती ‘हिंदुस्तान टाईम्स’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.

हे पॉडकास्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ला प्रतिउत्तर देईल, असा दावा करण्यात आला आहे. ‘पॉडकास्ट’ या ऑडिओ मॅसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे हा कार्यक्रम सुरू होऊ शकतो. दरम्यान, काँग्रेसनं नुकतंच आपलं एक यूट्यूब चॅनलदेखील सुरू केलं आहे. आत्तापर्यंत या यूट्यूब चॅनलला जवळपास ३ लाख जणांनी सबस्क्राईब केलं आहे. लॉकडाऊन काळात राहुल गांधी अनेक तज्ज्ञांशी डिजिटल माध्यमाद्वारे संवाद साधताना दिसत आहेत. शिवाय ते सोशल मीडियातही खूपच सक्रीय झालेले दिसत आहेत.


हेही वाचा – दिल्ली हिंसाचार प्रकरणी आरोपपत्र दाखल, ताहिर हुसेन हिंसाचाराचा मुख्य सुत्रधार


काँग्रेच्या नुकत्याच झालेल्या ‘स्पीक अप इंडिया’ या ऑनलाईन मोहिमेला मोठं यश मिळाल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. ५.७ कोटीहून अधिक पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विविध सोशल प्लॅटफॉर्मवर आपापले संदेश या मोहिमेत अपलोड केले होते. यात स्थलांतरीत मजूर, छोटे व्यवसाय यांना तातडीनं मदत करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली.

 

First Published on: June 2, 2020 3:41 PM
Exit mobile version