सोनिया गांधींचं गणित कच्चं – केंद्रीय मंत्री अनंत कुमार

सोनिया गांधींचं गणित कच्चं – केंद्रीय मंत्री अनंत कुमार

सोनिया गांधी

‘सोनिया गांधी यांचे गणित कच्चे असून त्यांना आकडेवारी जमत नाही,’ असा टोला केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी लगावला आहे. सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेमध्ये गदारोळ सुरु झाला आहे. विरोधी पक्षांनी विद्यमान सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडला आहे. त्याचबरोबर सोनिया गांधी यांनी बुधवारी आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचेही सांगितले आहे. यासोबतच आपले संख्याबळ शुक्रवारी संसदेत जाहीर करणार असल्याचे सोनिया गांधी यांनी जाहीर केले आहे.

‘मोदी सरकारलाच जनतेचा पाठिंबा!’

अनंत कुमार यांनी आज संसदेच्या बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. ‘विरोधी पक्षांनी कितीही अविश्वासाचा ठराव म्हणून आरडाओरड केली तरी मोदी सरकारलाच लोकांचा पाठिंबा असेल’, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढे त्यांनी सांगितले की, ‘सोनिया गांधी यांचे गणित कच्चे आहे. त्यांना आकडेवारी जमत नाही. १९९६ मध्ये देखील त्यांनी अशीच चुकीची आकडेवारी केली होती. त्यानंतर काय झाले, ते सगळ्यांनी बघितले. मोदी सरकार यांना संसदेत आणि संसदेच्या बाहेरही मोठा पाठिंबा आहे’.

शुक्रवारी ठरणार कोण किती पाण्यात!

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून सुरु झालेल्या अविश्वासाच्या ठरावाविषयीचे कोडे शुक्रवारी सुटणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, देशाभरात राजकीय वर्तुळात बऱ्याच घडामोडी घडू लागल्या आहेत. महाराष्ट्रामध्येही शिवसेना अविश्वासाच्या ठरावाला पाठिंबा देणार नसल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर शिवसेनेने असा निर्णय घेतलाच नसल्याचे समोर आले. त्यामुळे आता शिवसेना या ठरावात भाजपाच्या बाजूने मतदान करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोनिया गांधी यांनी शुक्रवारी बहुमत जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे विद्यमान सरकारनेही शुक्रवारीच प्रतिउत्तर देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कोण किती पाण्यात आहे, ते आता शुक्रवारीच ठरणार आहे.

First Published on: July 19, 2018 8:42 PM
Exit mobile version