आयुुष मंत्रालयाकडून करोनासंबंधी औषधाची चाचणी

आयुुष मंत्रालयाकडून करोनासंबंधी औषधाची चाचणी

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारी ‘राष्ट्रीय आयुर्वेद संस्थे’ने करोना संक्रमणावर उपचारासाठी चार औषधे तयार केली आहेत. यातील एक औषध ‘आयुष – ६४’ आहे. जयपूरमध्ये आयुष मंत्रालयाने करोना संक्रमित रुग्णांवर पहिल्यांदा या आयुष – ६४ ची क्लिनिकल ट्रायल सुरू केली आहे. ही क्लिनिकल ट्रायल कोविड – १९ संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात येणार्‍या रुग्णांवर एका खासगी रुग्णालयात पार पडत आहे. हे औषध या अगोदर मलेरियाच्या रुग्णांवर उपचारासाठी वापरले जात होते, त्यात काही बदल करून आता हे औषध करोनाच्या रुग्णांवर उपचार करता येऊ शकेल, असा विश्वास आयुर्वेद संस्थेच्या संचालकांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेच्या म्हणण्यानुसार, आयुष – ६४ चा अभ्यास करण्यासाठी क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशनलाही सोबत घेण्यात आले आहे. सुरुवातीला याचे चांगले परिणाम पाहायला मिळाले असले तरी तीन-चार महिन्यांत याचे परिणाम स्पष्टपणे समोर येतील.

दरम्यान, आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या म्हणण्यानुसार, आयुष मंत्रालयाचेही करोनावर औषध शोधून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जुलै महिन्यापर्यंत आयुष मंत्रालयही करोनाचे औषध बाजारात आणू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याच दरम्यान, श्रीपाद नाईक यांना योगगुरु रामदेव यांनी लॉन्च केलेल्या ‘कोरोनिल’विषयीही विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी ‘रामदेव बाबा यांनी कोणत्याही परवानगीशिवाय आपल्या औषधाची घोषणा करणे चूक’ असल्याचे म्हटले. आयुष मंत्रालयाकडून कोरोनिलच्या जाहिरातील आणि विक्रींवर बंदी घातली गेली आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, देशात एकूण रुग्णांचा आकडा साडे चार लाखांच्यावर पोहोचला आहे. भारतातील सध्या एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ५६ हजार ११५ वर पोहोचली आहे. यातील १४ हजार ४८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर या साथीच्या आजारातून आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत. देशातील वेगवेगळ्या रुग्णालयांत सध्या १ लाख ८३ हजार ०२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

First Published on: June 24, 2020 4:43 PM
Exit mobile version