CoronaVirus: कोरोनासाठी पोलीस बसला घोड्यावर!

CoronaVirus: कोरोनासाठी पोलीस बसला घोड्यावर!

कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणावर सुरू असताना पोलीस, डॉक्टर, प्रशासन अनेक नवनव्या क्लृप्त्या वापरून त्यासंदर्भात जनजागृती करताना दिसत आहेत. मात्र, आन्ध्र प्रदेशमधल्या एका पोलीस इन्स्पेक्टरने एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. आणि त्या कल्पनेमागचं लॉजिक देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागातल्या जनतेला मोबाईल किंवा टीव्हीवर माहिती मिळवणं तितकं शक्य नसतं. कारण बऱ्याच ग्रामस्थांकडे अशी साधनं नसतात. त्यामुळे त्यांना समजण्यासाठी चक्क एका घोड्यावर कोरोनाची चित्र रंगवून हा व्हायरस कसा असतो, कसा दिसतो, त्यामुळे काय होतं, काय काळजी घ्यायला हवी अशा गोष्टींबाबत ते ग्रामीण भागामध्ये जनजागृती करतात. या पोलीस निरीक्षकाचं नाव आहे मारूती शंकर!

आन्ध्र प्रदेशच्या कर्नूल जिल्ह्यातल्या पीपली मंडल या गावचे मारूती रहिवासी. पण गावातल्या अनेकांकडे टीव्ही किंवा मोबाईलच नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत कोरोनाची माहिती पोहोचवायची कशी? असा प्रश्न त्यांच्यासह प्रशासनाला देखील
पडला. नुसतंच माईकवर ओरडून काही उपयोग नाही, गावकऱ्यांना प्रत्यक्ष दिसलं देखील पाहिजे, अशा हेतूने मग त्यांनी
एका घोड्यावरच कोरोनाची चित्र रंगवली आणि त्यावर बसून ते गावात जनजागृती करायला लागले. आत्तापर्यंत आन्ध्रप्रदेशमध्ये २३ कोरोनाग्रस्त सापडले असून या राज्याने देखील लॉकडाऊन केलं आहे.

दरम्यान, मारूती शंकर यांच्या या कल्पनेचं काहींनी कौतुक केलं असलं, तरी काहींनी टीका देखील केली आहे. तुम्हाला जर वेगळीच कल्पना शोधून काढायची होती, तर कोरोनाचं हेल्मेट घालून फिरा. घोड्याला सोडून द्या, तुमचा हेतू चांगला असला, तरी दुसरी काहीतरी कल्पना शोधून काढा, अशा प्रकारची टीका ट्विटरवर त्यांच्या जनजागृतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर होऊ लागली. त्याला उत्तर देताना शंकर म्हणतात, ‘आम्ही घोड्याला जनजागृतीसाठी वापरत आहोत. त्याला मारहाण किंवा इजा केलेली नाही. कोरोनाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठीच आम्ही हे करत आहोत’.


Coronavirus Update: कोरोनामुळे मुंबईत नववा बळी!
First Published on: April 1, 2020 8:26 AM
Exit mobile version