अजबच! आता बकरी आणि फळंही सापडली कोरोना पॉझिटिव्ह!

अजबच! आता बकरी आणि फळंही सापडली कोरोना पॉझिटिव्ह!

जगभरात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा ३५ लाखांच्याही वर गेलेला असताना मृतांची संख्या २ लाख ४८ हजारांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट जगभर हाहा:कार माजवला आहे. मात्र, अजून देखील कोरोनावर लस शोधण्यात जगभरातल्या शास्त्रज्ञांना यश आलेलं नाही. त्यामुळे हे संकट अधिकाधिक गहिरं होत आहे. पण त्यातच आता बकरी आणि पपईही कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचं आढळून आल्यानं सगळ्यांनीच तोंडात बोटं घातली आहेत!

तर हा प्रकार घडलाय टांझानियात!

टांझानियामध्ये सर्वात शेवटची आकडेवारी येईपर्यंत ४८० कोरोनाबाधित रुग्ण आणि १७ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे तुलनेने टांझानियात कोरोनाचा अल्प प्रसार झाल्याचं दिसून येत आहे. पण टांझानिया सरकारच्या या आकडेवारीवर कुणी विश्वास ठेवायला तयार नाहीये. तिथे जास्त रुग्ण असूनही स्थानिक प्रशासन आणि सरकार ती माहिती लपवत असल्याचा आरोप देखील केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता टांझानियामध्ये बकरी आणि पपईमध्ये देखील कोरोना विषाणू आढळल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. खुद्द टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष जॉन मगुफुली यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवावाच लागेल!

पण खरा प्रकार मात्र वेगळाच!

खरंतर एखाद्या शेळीमध्ये किंवा फळामध्ये कोरोनाचा विषाणू सापडण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल. पण यावर टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं, की यामध्ये परदेशातून आयात केलेल्या टेस्टिंग किटचा दोष आहे. त्यांनी पहिल्यांदा एक शेळी आणि पपईमधले सॅम्पल घेतले. मग ते प्रयोगशाळेत कुठून घेतलेत याची कोणतीही पूर्वकल्पना न देता तपासणीसाठी पाठवले. आणि ते चक्क पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे जॉन मगुफुली यांनी थेट दावा केला आहे की हे टेस्टिंग किटच फॉल्टी आहेत. शिवाय, याच टेस्टिंग किटच्या मदतीने आत्तापर्यंत केलेल्या चाचण्या घेतल्या आहेत. त्यामुळे त्यातलीही अनेक लोकं निगेटिव्ह असतानाही पॉझिटिव्ह सापडण्याची शक्यता आहे, असं देखील म्हटलं जात आहे.

जॉन मगुफुली यांच्यावर असा आरोप केला जात आहे की त्यांनी टांझानियामधल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा लपवून ठेववा असून चुकीचा आकडा जाहीर केला आहे. तसेच, यातून पळवाट शोधण्यासाठीच मगुफुली असा दावा करत असल्याचं देखील सांगितलं जात आहे. दरम्यान, शेळी आणि पपईची टेस्ट पॉझिटिव्ह कशी आली? या प्रश्नाचं उत्तर मात्र अद्याप अनुत्तरीतच आहे.

First Published on: May 4, 2020 3:19 PM
Exit mobile version