Corona Update : केंद्राकडून दिलासा! परदेशातून येणाऱ्या कोरोना संबंधित मदतीवर IGST मधून सूट

Corona Update : केंद्राकडून दिलासा! परदेशातून येणाऱ्या कोरोना संबंधित मदतीवर IGST मधून सूट

परदेशातून येणाऱ्या कोरोना संबंधित मदतीवर IGST मधून सूट  

भारतामध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असून रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरु आहे. याच दरम्यान, केंद्र सरकारने आता मोठा दिलासा दिला आहे. कोरोनाशी संबंधित परदेशातून आलेल्या मदतीच्या आयातीवर वस्तू आणि सेवा करातून (IGST) तात्पुरती सूट देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. या वस्तूंवरील सीमा शुल्क आधीच रद्द करण्यात आले असून आता आयातीवर, सीमा शुल्क आणि आयजीएसटीही लागणार नाही, असे वित्त मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. यामध्ये रेमडेसिवीर, मेडिकल ऑक्सिजन, कोरोना लस आदी २० वस्तूंचा समावेश आहे. ही सूट ३० जूनपर्यंत लागू असणार आहे.

तात्पुरती सूट देण्याचा निर्णय

आयजीएसटीतून सूट देण्याबाबत केंद्र सरकारला परदेशातील दानशूर संस्था, कॉर्पोरेट संस्था आणि इतर संघटनांकडून व कंपन्यांकडून अनेक अर्ज आले होते. यात कोरोनाशी संबंधित मदत म्हणून उपकरणे आणि इतर साधने जी मोफत दिली जात आहेत, त्यांच्या आयातीवरील आयजीएसटीवर सवलत द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. याची दखल घेत केंद्राने कोविड रुग्णांसाठी मदत म्हणून मोफत अशा सर्व वस्तू आणि उपकरणे यांच्या आयजीएसटीतून तात्पुरती सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

सीमा शुल्कात सूट

केंद्र सरकारने याआधीच ऑक्सिजन आणि संबंधित उपकरणांवरील सीमा शुल्कात सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. तसेच कोरोना काळात लसींच्या आयातीवरील मूळ सीमा शुल्क तातडीने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय पुढील तीन महिन्यांसाठी लागू असेल, असेही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते.

First Published on: May 3, 2021 9:52 PM
Exit mobile version