लॉकडाऊनपासून वाचण्यासाठी नियम पाळा – पंतप्रधान मोदी

लॉकडाऊनपासून वाचण्यासाठी नियम पाळा – पंतप्रधान मोदी

निवडणूकजीवी केंद्र सरकार देशातील रोजगाराचा प्रश्न सोडवण्यात अपयशी, राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या काळात कोणतीही आरोग्य सुविधा कमी पडू देणार नाही. मात्र, लॉकडाऊनपासून वाचवायचे असेल तर सर्वांनी नियम पाळायला हवेत. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय धैर्य, अनुशासन कायम ठेवून लॉकडाऊनपासून आपण वाचू शकतो, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांना केले. देशातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता पंतप्रधान गेल्या काही दिवसांपासून विविध घटकांशी चर्चा करत आहेत. मोदींची आज लस उत्पादन कंपनीशी चर्चा झाली, त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित केले.

देशाला लॉकडाऊनपासून तुम्हीच वाचवू शकता. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय आहे. लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ नये. उद्या रामनवमी आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा संदेश हाच आहे, आपण मर्यादेत राहावे. कोरोना नियमांचे पालन शतप्रतिशत करा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

माझी तरुणांना विनंती आहे. त्यांनी आपल्या सोसायटी, परिसरात छोटी कमिटी बनवून कोविड नियम लागू करण्यासाठी मदत करावी. आपण तसे केले तर लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता लागणार नाही. स्वच्छता अभियानसाठी पाचवी ते दहावीच्या बालमित्रांनी खूप मदत केली होती. त्यांनी घरच्यांना आणि लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला होता. आज त्यांना मी विनंती करतो, घरात असे वातावरण तयार करा की, घरातील लोक विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रसारमाध्यामांनीही लोकांना सतर्क करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणखी वाढवावे. तसेच लोकांमध्ये भीती आणि अफवा वाढू नये. याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे. राज्यांनी शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा, असे पंतप्रधान म्हणाले.

स्वच्छता अभियानात बालकांनी मोठे काम केले. आता कोरोनाकाळात विनाकाम, विनाकारण घराबाहेर पडू नका. तुमच्यामुळे आम्ही विजय मिळवू शकतो. या संकटकाळात लोकांना जी मदत केली जाते, ती वाढवा. जी भीतीदायक स्थिती आहे ती कमी होईल. अफवा आणि भ्रम पसरण्याला आळा बसेल, असेही मोदींनी स्पष्ट केले.

लसीकरण अभियान वेगात सुरू
लसीकरणाचे काम जोरात सुरू आहे. आपला भारत दोन मेड इन इंडिया लसींसोबत जगभरातील मोठे लसीकरण अभियान राबवत आहे. जास्तीत जास्त आणि गरजू लोकांपर्यंत लस पोहोचावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतात अतिशय वेगाने लसीकरण मोहीम सुरू आहे. या लढाईत कोविड वॉरियर आणि वृद्धांना लस दिली गेली आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाईल. भारतात जी लस बनेल त्याचा अर्धा वाटा थेट रुग्णालय आणि देशाला मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले.

First Published on: April 21, 2021 4:30 AM
Exit mobile version