एका दिवसात १ कोटी लोकांचे लसीकरण

एका दिवसात १ कोटी लोकांचे लसीकरण

कोरोना संकटातून देशातील नागरिकांना दूर ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या लसीकरण मोहिमा राबवल्या जात आहेत. लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर देशात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची दाट शक्यता लक्षात घेऊन शुक्रवारी देशभर लसीकरणाची जोरदार मोहीम राबवली गेली. या मोहिमेत दिवभरात एक कोटी लोकांना लस देण्यात आली. एका दिवसाच्या लसीकरणाचा हा विक्रमच म्हटला पाहिजे. या मोहिमेमुळे देशभरात लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या ६० कोटींच्या घरात गेली आहे.

केंद्र सरकारच्या या एक दिवसाच्या लसीकरणाची मोहीम प्रथमच राबवण्यात आली. दिवसभरात एक कोटी लोकांना लस देण्यात आली. आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी याचे श्रेय पंतप्रधानांना देऊन टाकले. आरोग्य कर्मचार्‍यांच्या प्रयत्नामुळे हे यश मिळू शकले, असे पवार यांनी म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी सर्वाधिक म्हणजे 28.62 लाख लसी या उत्तर प्रदेशात देण्यात आल्या. त्या खालोखाल कर्नाटकमध्ये 10.79 लाख, महाराष्ट्रात 9.84, हरियाणामध्ये 6 लाख तर पश्चिम बंगालमध्ये 5.47 लाख लसी देण्यात आल्या.

देशात आतापर्यंत 62.17 कोटी डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 14.08 कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर 49.08 लाख लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. एकूण लोकसंख्येचा विचार करता भारताने आपल्या प्रौढ नागरिकांच्या 50 टक्के लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

आतापर्यंत भारतामध्ये 3 कोटी 26 लाख 49 हजार 947 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 4 लाख 37 हजार 370 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरानाचा मृत्यू दर हा सध्या 1.34 टक्क्यांवर आहे. भारतामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून, लसीकरण ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. भारतामध्ये लसीकरणाचेे दिवसेंदिवस वेगवेगळे विक्रम होत आहेत. मात्र एका दिवसांमध्ये एक कोटी लस देणे हा जगातील सर्वात मोठा विक्रम आहे. अशा या विक्रमाची उद्योगपती बील गेट्स यांनी दखल घेत लसीकरणाच्या विक्रमाचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. हा विक्रम म्हणजे सरकार, आरोग्य कर्मचारी आणि लसी निर्मिती करणार्‍या कंपन्यांचे सामूहिक यश असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

First Published on: August 29, 2021 4:00 AM
Exit mobile version