Corona: चीनमध्ये कोरोनाची वापसी; वुहाननंतर हार्बिन बनले कोरोना हॉटस्पॉट केंद्र!

Corona: चीनमध्ये कोरोनाची वापसी; वुहाननंतर हार्बिन बनले कोरोना हॉटस्पॉट केंद्र!

चीन मधील वुहान शहर हे कोरोना व्हायरसचे केंद्रस्थान मानले जाते. बऱ्याच अवधीनंतर लॉकडाऊन संपल्यानंतर चीनच्या वुहानमधील लोकांचे जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर आले आहे. मात्र पूर्वेकडील हार्बिनचे शहर कोरोनाचे नवे केंद्र बनत आहे. या प्राणघातक व्हायरसने केवळ चीनमध्येच नव्हे तर संपूर्ण जगात हैदोस माजवला आहे. आतापर्यंत पावणे दोन लाखांहून अधिक लोक कोरोनाने बळी गेले आहेत. वुहाननंतर आता हार्बिन शहरात कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट केंद्र झाले असून त्यानंतर चीन सरकारने संपूर्ण शहर सील केले आहे. चीनचे हार्बिन शहर रशियन सीमेला लागून असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रदेशात कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

पुन्हा लोकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय

कोरोना व्हायरसचा उद्रेक चीनच्या वुहान शहरातून सर्वप्रथम झाला. अनेक महिन्यांच्या लॉकडाऊननंतर चीनच्या वुहान शहराला कोरोनामुक्त जाहीर करून तेथील जीवन पुर्ववत केले होते. यानंतर चीनने असा दावा केला की, आता चीनने कोरोनावर नियंत्रण मिळवले असून तेथील मृतांची संख्या इतर देशांपेक्षा खूपच कमी आहे. चीनच्या हिलॉन्गजियांग भागात कोरोनाचा तीव्र प्रसार झाल्यानंतर चीन सरकारने कडक पावले उचलली होती. या भागात परदेशातून आलेल्या बहुतेक लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले होते.

वुहाननंतर हार्बिन बनले कोरोना हॉटस्पॉट

आता हिलॉन्गजियांगची राजधानी, हार्बिन येथे कोरोनाचे नवीन रूग्ण आढळल्याने या शहरात बाहेरील लोक व वाहनांच्या प्रवेशावरील बंदी आणण्यात आली आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा झाल्याने चीनमधील या हॉटस्पॉट क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना पुन्हा क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अहवालानुसार, गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल झालेल्या ३५ जणांना रुग्णालयातील एका ८७ वर्षीय कोरोना बाधित रूग्णाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर हार्बिन शहर हे नवीन कोरोना क्लस्टर म्हणून मानले जाऊ लागले. शहराची लोकसंख्या एक कोटीपेक्षा जास्त आहे. हार्बिनमधील सर्व शाळा व महाविद्यालये सध्या बंद आहेत.


CoronaVirus: देशात चीनपेक्षा स्वस्त आणि चांगले ३ लाख रॅपिड टेस्टिंग किट्स तयार!
First Published on: April 23, 2020 9:35 AM
Exit mobile version