पहिल्याच दिवशी घोळ, दिल्ली विमानतळावरील ८२ उड्डाणे रद्द

पहिल्याच दिवशी घोळ, दिल्ली विमानतळावरील ८२ उड्डाणे रद्द

विमानतळावर डिस्टन्स ठेवत रांगेत उभे असलेले प्रवाशी

आजपासून देशाअंतर्गत विमान वाहतूक सेवा सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी ही आनंदाची बाब असली तरी अनेक प्रवाशांना पहिल्याच दिवशी निराशेला सामोरे जावे लागले आहे. आज पहाटेपासून प्रवाशांनी दिल्ली एअरपोर्ट गाठायला सुरुवात केली होती. मात्र तिथे गेल्यानंतर शेवटच्या क्षणी काही विमाने रद्द केली असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर टेक ऑफ घेण्यासाठी इच्छूक असलेल्या प्रवाशांच्या इच्छांवर विमानतळ प्रशासनाने पाणी सोडले. आज किमान ८० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्लीहून पोर्ट ब्लेअर, कलकत्ता, हैदराबाद, मुबंई, इंदोरला जाणाऱ्या पहाटेचे विमाने रद्द करण्यात आले. मुंबईत देखील अशाच पद्धतीने उड्डाणे रद्द करण्यात आले. गुवाहाटी विमानतळावर देखील हीच परिस्थिती होती, त्यामुळे प्रवाशांना ताटकळत अनेक तास बसावे लागले.

उड्डाणे रद्द होण्याचे कारण राज्यांची ताठरता

दिल्ली विमानतळावरुन उड्डाण घेणारे ८२ विमाने रद्द करण्यात आली आहेत. याआधी नागरी वाहतूक मंत्रालयाने १९० उड्डाणे आणि १९० लँडिंगचा अंदाज व्यक्त केला होता मात्र आता ११८ विमाने लँडिंग आणि १२५ टेक ऑफ करणार असल्याची माहिती मिळत आहे. काही राज्यांनी विमानांच्या वाहतुकीवर काही प्रमाणात निर्बंध लावल्यामुळे विमानांना रद्द करावे लागले.

देशभरातील विविध विमानतळावर प्रवाशी आपल्या विमानाची वाट पाहत होते. मुबंई विमानतळावर दिल्लीला जाणाऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, माझे विमान ऑनलाईनवर वेळेवर दाखवत आहे. एजंटने सुद्धा विमान ११ ला टेक ऑफ घेणार असल्याचे सांगितले. मात्र विमानतळावर विमान रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे. जर हे आधीच मला कळले असते तर मी विमानतळावर आलोच नसतो.

First Published on: May 25, 2020 1:23 PM
Exit mobile version