ऐकावं ते नवलच, ६५ वर्षांच्या म्हातारीला १८ महिन्यांत झाली ८ मुलं!

ऐकावं ते नवलच, ६५ वर्षांच्या म्हातारीला १८ महिन्यांत झाली ८ मुलं!

६५ वर्षींय लिला देवी

भ्रष्टाचार हा विषय देशातल्या नागरिकांसाठी काही नवीन विषय राहिलेला नाही. तसाच तो नेतेमंडळींसाठी आणि सरकारी बाबू-कर्मचाऱ्यांसाठी देखील जुना आणि आता बराचसा रोजच्या सवयीचाच भाग झाला आहे. पण त्यातही या भ्रष्टाचाराच्या अनेक तऱ्हा समोर येत असतात. भ्रष्टाचाराचा असाच एक अजब गजब नमुना बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात समोर आला आहे. एखाद्या शेंबड्या पोरालाही ज्यावर विश्वास बसणं कठीण होईल, असा प्रकार बिहारच्या या जिल्ह्यात सरकारी कागदोपत्री सिद्ध झालेला आहे. आणि नेहमीप्रमाणे असं काही घडलं, की त्यामागे चौकशीचा फार्स सुरू होतो, तसा याही बाबतीत सुरू झाला आहे. हिंदुस्तान टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हा प्रकार घडलाय…

बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्याच्या मुसाहारी ब्लॉकमधल्या छोटी कोठिया गावात. गावात राहणाऱ्या लीला देवी यांचं आजचं वय आहे ६५ वर्ष. त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार त्यांनी त्यांच्या सगळ्यात लहान आणि सगळ्यात शेवटच्या मुलाला जन्म देऊन आज २१ वर्ष उलटली आहेत. त्याच्या आधीची ३ अशी मिळून लीला देवी यांना ४ मुलं. पण वयाची ६५ वर्ष पूर्ण करणाऱ्या लीला देवींना एके दिवशी अचानक असं कळतं की त्यांनी गेल्या १८ महिन्यात तब्बल ८ बाळांना जन्म दिला आहे! आता आईलाच माहीत नाही की तिनं ८ मुलांना जन्म दिला आहे हे भलतंच झालं!

लीला देवी जेव्हा याचा खुलासा करण्यासाठी…

ग्राहक सेवा केंद्रावर गेल्या, तेव्हा त्यांना खरी गोम कळते. बिहार सरकारकडून नवमातांसाठी नॅशनल हेल्थ मिशन अर्थात NHM अंतर्गत एक योजना चालवली जाते. यामध्ये नॅशन मेटर्निटी बेनिफिट स्कीम अर्थात NMHS या योजनेच्या माध्यमातून नव्याने जन्म दिलेल्या मातांना आरोग्य सुविधांसाठी १४०० रुपये आणि त्यांचं बाळंतपण करणाऱ्या आशा सेविकांना ६०० रुपये सरकारकडून दिले जातात. याच योजनेमध्ये लीला देवींना लाभार्थी करून त्यांच्या नावे ८ वेळा हे पैसे काढले गेले आणि त्यांना दिले गेल्याचीही नोंद करण्यात आली आहे! लीला देवींनी विचारणा केल्यावर ‘तुम्ही तक्रार करू नका, तुमच्या नावे काढलेले पैसे तुम्हाला मिळून जातील’, असं उत्तर त्यांना मिळालं!

वास्तविक लीला देवी या मुझफ्फरपूरमधल्या….

अशा काही एकट्या महिला नाहीत. त्यांच्याप्रमाणेच इतरही अनेक महिलांच्या नावे अशाच पद्धतीने या योजनेचा पैसा लाटला गेला आहे. याबद्दल मुझफ्फरपूरचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पण हे सगळं घडवून आणणारा ग्राहक सेवा केंद्रातला क्लार्क मात्र तेव्हापासून फरार आहे. तर ज्या बँकेतून हे सगळे पैसे काढले जात होते, त्या बँकेच्या मॅनेजरला याबद्दल काही माहितीच नाहीये. आता या प्रकरणाची जर पारदर्शी चौकशी झाली आणि त्यातून काही हाती लागलंच, तरच या प्रकरणातले खरे दोषी समोर येऊ शकतील. नाहीतर हा देखील भ्रषाचाराच्या अशा असंख्य नमुन्यांमधलाच एक नमुना बनून राहील!

First Published on: August 21, 2020 9:30 PM
Exit mobile version