कोरोनामुळे वाचले २० हजार भारतीय नागरिकांचे प्राण

कोरोनामुळे वाचले २० हजार भारतीय नागरिकांचे प्राण

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनामुळे भारतात ५५ हजार रुग्णांचे प्राण गेले आहेत. आतापर्यंत एकूण २९ लाख भारतीय कोरोनाबाधित झाले असून त्यापैकी २१ लाख ६० हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर ६ लाख ९४ हजार रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. अतिशय धक्कादायक आकडे रोजच्या रोज येत असताना एक सुखद आकडा सध्या आपल्या समोर आला आहे. मुंबई मिरर या संकेतस्थळावरील वृत्तानुसार कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात रस्ते अपघात न झाल्यामुळे २० हजार ३०० नागरिकांचे प्राण वाचले आहेत.

रस्ते सुरक्षा समितीमार्फत सुप्रीम कोर्टात एक अहवाल दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये एप्रिल ते जून या तिमाहीत यावर्षी २०,७३२ नागरिकांनी आपले प्राण गमवल्याचे सांगण्यात आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी याच तिमाहीत भारतात ४१,०३२ नागरिकांनी आपले प्राण गमावले होते. २०१९ ची तुलना केल्यास यावर्षी लागलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिक घराबाहेर पडले नाहीत. परिणामी रस्ते अपघातात घट होऊन २० हजार नागरिकांचे प्राण वाचले असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे.

एकूणच, २०२० च्या पहिल्या सहा महिन्यात रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यावर्षी पहिल्या सहा महिन्यात २३,४०० मृत्यू वाचले असल्याचे या अहवालाची आकडेवारी सांगते. दरम्यान लॉकडाऊनमुळे ८५ टक्के नागरिक अपघातात बळी पडण्याचा धोका कमी झाला आहे. तर लॉकडाऊनच्या आधी जानेवारी ते मार्च महिन्यात देखील रस्ते अपघातामधील मृत्यूदरात ८ टक्क्यांनी घट झाली होती.

फक्त मृत्यूच नाही तर रस्ते अपघातात देखील घट झाली. एप्रिल ते जून दरम्यान ६३ हजार अपघात कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रस्ते अपघातात जखमी होण्याचे प्रमाण ६९ हजारांनी कमी झालेले आहे. यावर्षी टळलेल्या मृत्यूची आकडेवारी पाहिल्यास उत्तर प्रदेश ३,२७५, त्यानंतर तामिळनाडू २,१९३, महाराष्ट्र १,६१७, राजस्थान १,४८४ आणि मध्य प्रदेश १,१४९, तसेच राजधानी दिल्लीत २१७ मृत्यू वाचलेले आहेत.

मृत्यूचे प्रमाण अर्ध्याहून कमी होण्याच्या कारणाबाबत तज्ज्ञ मंडळींनी दोन निष्कर्ष काढले आहेत. एक म्हणजे मोटार वाहन कायद्यात बदल करुन दंडाची रक्कम वाढविल्यामुळे वाहन चालक शिस्तीत वाहन चालवत आहेत आणि दुसरे म्हणजे कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन. मोटार वाहन कायद्यात दंडाची आणि तुरुंगाच्या शिक्षेची तरतूद केल्यामुळे वाहन चालकांमध्ये शिस्त आलेली आहे. नियम मोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

First Published on: August 21, 2020 4:36 PM
Exit mobile version