Covid Booster Dose : भारतात कोविड बूस्टर डोसची गरज आहे का? एम्सचे संचालक काय म्हणाले जाणून घ्या

Covid Booster Dose : भारतात कोविड बूस्टर डोसची गरज आहे का? एम्सचे संचालक काय म्हणाले जाणून घ्या

कोरोनाविरोधातील लस देऊनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. अनेकांना लस देऊनही कोरोना होत असल्यामुळे अनेक देशांमध्ये कोरोना लसीचा बुस्टर डोस (Covid Booster Dose) दिला जात आहे. त्यामुळे आता भारतात देखील बुस्टर डोस दिला जाणार का? या बाबत संभ्रम आहे. दरम्यान, अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे (All India Institute of Medical Sciences – AIIMS – एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी यावर भाष्य केलं आहे. सध्या आपल्याकडे बूस्टर डोस आवश्यक आहे की नाही याबद्दल पुरेसे डेटा उपलब्ध नाही, असं डॉ. गुलेरिया यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं.

डॉ रणदीप गुलेरिया म्हणाले, “मला असे वाटत नाही की बूस्टर डोसटची गरज आहे हे सांगण्यासाठी आमच्याकडे सध्या पुरेसा डेटा आहे. आपल्याकडे उच्च-जोखीम गटांबद्दल पुरेसा डेटा नाही.” यासह, ते म्हणाले की पुढील वर्षापर्यंत आपल्याकडे डेटा उपलब्ध असेल. जागतिक स्तरावर, आम्ही पाहत आहोत की ज्या लोकांना लसीकरण करण्यात आले आहे, त्यांना गंभीर आजारांपासून संरक्षण मिळते. रुग्णालयात दाखल होणाऱ्या लोकांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. भारतातही असंच आहे, असं गुलेरिया म्हणाले.

इस्रायल बूस्टर डोस देणार

कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटच्या वाढत्या प्रकरणांमुळे इस्रायलने ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोविड -१९विरुद्धच्या लसीचा तिसरा बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलं आहे की अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) मान्यता दिल्यास, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोराना विषाणूविरोधी लसीचा बूस्टर डोस दिला जाईल.

भारतातील कोरोना परिस्थिती

देशात शनिवारी कोविड -१९चे ३४,४५७ नवीन रुग्ण आढळल्यानंतर शनिवारी संक्रमित लोकांची एकूण संख्या ३,२३,९३,२८६ झाली. त्याच वेळी, सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या ३,६१,३४० वर आली आहे जी १५१ दिवसातील सर्वात कमी आहे.

 

First Published on: August 21, 2021 11:51 PM
Exit mobile version