गाईला आलिंगन… केंद्र सरकारकडून परिपत्रक रद्द; हे आहे कारण…

गाईला आलिंगन… केंद्र सरकारकडून परिपत्रक रद्द; हे आहे कारण…

 

नवी दिल्लीः प्रेमाचा दिवस म्हणून ओळख असलेल्या १४ फेब्रुवारीला गाईला आलिंगन द्या, असा फतवा केंद्र सरकारने काढला होता. देशभरातून या फतव्यावर टीका झाली. अखेर शुक्रवारी केंद्र सरकाराने हा निर्णय मागे घेतल्याची घोषणा केली.

पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्सव्यवसाय मंत्रालयाने हा फतवा काढला होता. त्याचे अधिकृत परिपत्रकही निघाले होते. येत्या १४ फेब्रुवारीला काऊ हग डे म्हणजेच गाईला आलिंगन दिन साजरा करा, असे आवाहन या परिपत्रकातून करण्यात आले होते. एकूणच काय तर १४ फेब्रुवारीला गाईला मिठी मारा, असे सांगण्यात आले होते. मत्स्य व्यवसाय मंत्रालयाचे सचिव डॉ.एस.के.दत्ता यांनी हे परिपत्रक जारी केले होते. गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गाय ही आपले जीवन टिकवते, पशुधन आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे गाईला प्रेमाच्या दिवशी मिठी मारा, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले होते.

या परिपत्रकावर देशभरातून टीका झाली. मिठी मारताना गाय हिंसक झाली आणि तिने लाथ मारली तर काय करायचे, असा सवाल काहींनी केला. सोशल मिडियावरही याची चांगलीच चर्चा रंगली. गाईला मिठी मारल्याचे फोटोही काहींनी सोशल मिडियावर टाकले. काही फरक पडत नाही तुम्ही प्राण्यांना कधी मिठी मारता. मात्र प्राण्यांचे प्रेम हे निसंदेह असते, असे एका नेटकऱ्याने लिहिले. १४ फेब्रुवारीला काऊ हग डे हा चांगला उपक्रम आहे. तो साजरा झालाच पाहिजे, अशी मागणी एका नेटकऱ्याने केली. ६ फेब्रुवारीला जारी झालेल्या या परिपत्रकावर टीकेची झोड उडाली. त्यामुळे पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्सव्यवसाय मंत्रालयाने हे परिपत्रकच मागे घेतले.

दरम्या माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या फतव्यावर टीका केली होती. केंद्र सरकारने हा फतवा मागे घेतल्यानंतर त्याची माहितीही आव्हाड यांनी ट्विट करुन दिली.

 

First Published on: February 10, 2023 9:21 PM
Exit mobile version