प्रसूती वेदनेने तळमळणाऱ्या महिलेच्या मदतीला धावले जवान

प्रसूती वेदनेने तळमळणाऱ्या महिलेच्या मदतीला धावले जवान

छत्तीसगडमधील नक्षलप्रभावित बीजापूर जिल्ह्यात मंगळवारी प्रसूती वेदनेने तळमळणाऱ्या आदिवासी महिलेच्या मदतीला सीआरपीएफचे जवान धावून गेले. महिलेला एका खाटेवर बसवून तब्बल सहा किलोमीटर पायी चालत जवानांनी तिला रुग्णालयात पोहोचवले. जवानांनी दाखवलेल्या या प्रसंगावधनाने महिलेचे प्राण वाचले असून जवानांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नक्षलप्रभावित असलेल्या बीजापूर जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांची ८५ वी बटालियनची तुकडी तैनात करण्यात आली आहे. मंगळवारी जवान गस्त घालत असताना येथील पदेडा गावात एक गर्भवती महिला प्रसूती वेदनेने तळमळत असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर प्रथोमपचाराच्या दलासह तुकडीचे कमांडर व काही जवान महिलेच्या गायतापारा येथील घरी पोहचले. महिलेची प्रसूती कुठल्याही वेळी होणार असल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. यामुळे जवानांनी क्षणाचाही विलंब न करता बांबूची खाट तयार केली व त्यावर महिलेला घेऊन तब्बल सहा किलोमीटर पायी चालत रुग्णालय गाठले. जवानांनी योग्य वेळी महिलेला रुग्णालयात पोहचवल्याने तिच्यावर योग्य उपचार करणे डॉक्टरांना शक्य झाले.

First Published on: January 22, 2020 2:15 PM
Exit mobile version