बँक ऑफ मॉरीशसवर सायबर हल्ला

बँक ऑफ मॉरीशसवर सायबर हल्ला

Cyber attack

मुंबईच्या नरीमन पॉईंट विभागात असणार्‍या स्टेट बँक ऑफ मॉरीशस या शाखेत २ ऑक्टोबर रोजी सायबर हल्ला झाल्याने १४३ कोटी रुपये गहाळ झाले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे ५ ऑक्टोबर रोजी तक्रार नोंदवण्यात आली होती. बँकेचा सर्व्हर हॅक करत वेगवेगळ्या खात्यांमध्ये शिरकाव करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून अनेक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले. ही सर्व बँक खाती देशाबाहेरची आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही, अशी माहीती पोलिसांकडून देण्यात आली. यासंदर्भात बँकेने कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी या प्रकरणाचा तपास सायबर एक्स्पर्टच्या सहाय्याने केला जात आहे.

गेल्या वर्षभरात घडलेल्या घटनांपैकी बँकेवर सायबर दरोडा पडण्याची ही तिसरी घटना आहे. याआधी चेन्नईतील सिटी युनिअन बँक आणि पुण्यातील कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला होवून अनुक्रमे 34 कोटी आणि कॉसमॉस प्रकरणात ७८ कोटींची रक्कम २८ देशांतील एटीएम केंद्रातून काढण्यात आली होती. कॉसमॉस बँक चोरी प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली होती. तपास केला असताना चेन्नईतील बँक दरोड्यातही त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.

बँक ऑफ मॉरीशसच्या नरीमन पॉईंट येथील शाखेकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले असून गहाळ झालेल्या रकमेपैकी आम्ही ८० टक्के रक्कम परत मिळवण्यात यशस्वी झालो आहोत, असे त्यात सांगण्यात आले आहे. यापुढे बँकेच्या सुरक्षेबद्दल योग्य ती काळजी घेणार असून त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी सांगितले, मात्र यामध्ये किती तथ्य आहे ते पोलीस तपासात समोर येणार आहे.

First Published on: October 13, 2018 1:42 AM
Exit mobile version