गाजा चक्रीवादळ: तामिळनाडूच्या १३ जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट

गाजा चक्रीवादळ: तामिळनाडूच्या १३ जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट

बंगालच्या खाडीमध्ये मोठा दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ येत्या १५ नोव्हेंबरला कुड्डालोर आणि श्रीहरिकोटाच्या मध्ये उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवरुन जाण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला गाजा चक्रीवादळ असे नाव देण्यात आले आहे. हे चक्रीवादळ १२ किलोमीटर प्रती तासाच्या वेगाने पुढे सरकत आहे. पुढच्या २४ तासामध्ये हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या १३ जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

तामिळनाडू, पुडुचेरी आणि आंध्रप्रदेशमध्ये ८० ते ९० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने हवा येण्याची शक्यता आहे. प्रादेशिक चक्रवात चेतावणी केंद्राचे निर्देशक एस बालचंद्रन यांनी सांगितले की, उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर १४ नोव्हेंबरच्या रात्री काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यात आहे. तर १५ नोव्हेंबरला बऱ्याच ठिकाणी सरासरी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश

मच्छिमारांना १२ नोव्हेंबरपासून मासेमारीसाठी समुद्रात उतरु नये असे आदेश देण्यात आले आहेत. जे मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेले आहेत त्यांना परत येण्यास सांगण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याने चक्रीवादळ १५ नोव्हेंबरला उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवरुन पुढे सरकत हळू हळू चक्रीवादळाचे रुप सौम्य होण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूच्या १३ जिल्ह्यामध्ये हायअलर्ट

आपत्ती व्यवस्थापन मंत्री आर बी उदयकुमार यांनी सांगितले की, तामिळनाडूच्या ३२ पैकी १३ जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. गाजा चक्रीवादळामुळे प्रतिबंधक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. यासाठी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्यासोबत चार उच्चस्तरीय बैठकी घेण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तामिळनाडूच्या १३ जिल्ह्यामध्ये सतर्कता बाळगण्यास सांगितली आहे. चेन्नई आणि कांचीपुरमसारख्या जिल्ह्यांना आम्ही प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासना देखील सतर्क करून उपाय योजना आखण्यास सांगितल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: November 12, 2018 5:39 PM
Exit mobile version