ओडिशा आणि आंध्रप्रदेशमध्ये तितली चक्रीवादळाचे रौद्ररुप

ओडिशा आणि आंध्रप्रदेशमध्ये तितली चक्रीवादळाचे रौद्ररुप

तितली चक्रीवादळ

ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या तितली या चक्रीवादळाने झोडपून काढले. बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तितली चक्रीवादळाने रौद्ररुप धारण केले आहे. तितली चक्रीवादळामुळे ओडिशा आणि आंध्रप्रदेशमध्ये जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. या चक्रीवादळामुळे आंध्रप्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे तर ओडिशामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तितली चक्रीवादळ १५० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वाहत आहे. या वादळामुळे आंध्रप्रदेश आणि ओडिशामध्ये घरांचे मोठे नुकसान झाले आहे, झाडे उन्मळुन पडली आहेत तर विजेचे खांब रस्त्यावर पडले आहेत.

ओडिशामध्ये हायअलर्ट

तितली चक्रीवादळामुळे आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम आणि विजियानगर जिल्हा तर ओडिशामध्ये गजपती आणि गंजाम जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. ओडिशाला पार करुन हे चक्रीवादळ आता पश्चिम बंगालच्या गंगेच्या किनाऱ्याच्या दिशेने पुढे सरकत आहे. या वादळामुळे आंध्रप्रदेश आणि ओडिशामध्ये धुवादार पाऊस पडत आहे. ओडिशामध्ये प्रशासनाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

३ लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

या वादळामुळे तडाखा ओडिशा आणि आंध्रप्रदेशला चांगलाच बसला आहे. घरांचे नुकसान झाल्यामुळे अनेक जण बेघर झाले आहेत. आतापर्यंत जवळपास ३ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या सर्व लोकांसाठी १,११३ राहत शिबिर लावण्यात आले आहेत. ओडिशाच्या गंजमच्या १०८ आणि जगतसिंहपूरच्या १८ गर्भवती महिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

वादळामुळे शेतीचे मोठे नुकसान

तितली चक्रीवादळामुळे ओडिशाच्या गोपालपूरमध्ये भूस्खलनाची घटना घडली. ओडिशाच्या ८ जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यातील नदी काठच्या गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असल्याने सावधानता बाळगण्यास सांगितले आहे. हवामान खात्याने येत्या २४ तासामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हाय अलर्ट दिला आहे. मुसळधार पावसामुळे शेतांचे मोठे नुकसान झाले आहे. १२ ऑक्टोबरपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

श्रीकाकुलम अंधारात

आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे २००० विजेचे खांब कोसळले त्यामुळे श्रीकाकुलमच्या अनेक भागात वीज गेली आहे. वीज वितरण कंपनीने श्रीकाकुलम जिल्ह्यातील ४ हजार ३१९ आणि सहा शहरांमध्ये वीज गेल्याचे सांगितले आहे.

First Published on: October 12, 2018 12:40 PM
Exit mobile version