Lockdown: पत्नीकडून लूडोत हरला; संतापलेल्या पतीने पत्नीचा मणकाच मोडला

Lockdown: पत्नीकडून लूडोत हरला; संतापलेल्या पतीने पत्नीचा मणकाच मोडला

प्रातिनिधिक छायाचित्र

देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे घरात बसून काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर करत अनेक लोक आला दिवस ढकलत आहेत. काहीजण मोबाईलमध्ये लूडो गेम खेळताना दिसतात. मात्र हा लूडो गेम गुजरातच्या वडोदरामध्ये एका महिलेला चांगलाच भारी पडला. पती-पत्नी घरात लूडो खेळत होते. पत्नीसोबत वारंवार लूडोमध्ये हरल्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीला मारझोड केली. या मारहाणीत २४ वर्षीय पत्नीच्या मणक्याला जबर मार लागल्याची माहिती मिळत आहे.

गुजरात सरकारच्या महिलासंबंधी अभ्यम १८१ या हेल्पलाईनवर फोन करुन पीडित महिलेने आपल्यावरील प्रसंग कथन केला. या महिलेने हेल्पलाईनवरील समुपदेशकाला सांगितले की, आपल्या पतीला लूडो खेळात तीन-चार वेळा तीने लागोपाठ हरवले. त्यानंतर चिडलेल्या पतीने तिच्यासोबत वाद घातला. या वादाचे रुपांतर भांडणात झाल्यानंतर पतीने पत्नीला मारझोड करायला सुरुवात केली. यातच महिलेच्या मणक्याला जबर मार बसला.

समुपदेशकाने या महिलेच्या कैफियतीबद्दल माहिती देताना सांगितले की, “पीडित महिलेचा पती एका इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत काम करतो. त्याचा पगार जेमतेम घर चालविण्या इतपत आहे. त्यातच त्याच्या डोक्यावर कर्ज देखील आहे. घरखर्च चालविण्यासाठी पीडित महिला घरी लहान मुलांचे ट्यूशन घेते. तसेच तिने ब्युटीशियनचा कोर्स देखील केलेला आहे. कदाचित तिच्या पतीला आपली पत्नी बुद्धिमान असल्याचा आणि ती पैसेही कमावत असल्याचा राग डोक्यात असावा. यातच तिने त्याला लूडोमध्ये वारंवार हरवल्यानंतर त्याच अहम दुखावला गेला असल्यामुळे त्याने मारझोड केली असावी.”

हेल्पलाईनवरी समुपदेशकाने पीडित महिलेला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. मात्र पतीने झालेल्या प्रसंगाबद्दल माफी मागितल्यामुळे पत्नीने तक्रार न दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आता पतीला पुन्हा पत्नीला त्रास न देण्याची तंबी देण्यात आली आहे. जर पुन्हा त्याने मारहाण केली, तर त्याला तुरुगांत धाडण्यात येईल, असा इशारा १८१ हेल्पलाईनने दिला आहे.

गुजरात सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी १८१ अभ्यम हेल्पलाईन सेवा दिलेली आहे. १९ एप्रिलपर्यंत एका महिन्याच्या ८ हजार ७८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये कौटुंबिक हिंसाचार, महिलांवरील अत्याचार, मारझोड, तसेच शोषणाच्या तक्रारींचा समावेश आहे. लॉकडाऊननंतर येणाऱ्या तक्रारीमध्ये १० टक्के वाढ झाली आहे.

First Published on: April 27, 2020 7:52 PM
Exit mobile version