भारताच्या वाट्याची एक इंचही जमीन कोणालाच देणार नाही – राजनाथ सिंह

भारताच्या वाट्याची एक इंचही जमीन कोणालाच देणार नाही – राजनाथ सिंह

चीनने भारतातील अनेक भागावर आपला दावा केला आहे. पण ही गोष्ट अमान्य असल्याचे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज गुरूवारी राज्यसभेत स्पष्ट केले. आम्ही लाईन ऑफ एक्शन म्हणजे एलओसीवर संपुर्णपणे शांतता ठेवण्यासाठी कटीबद्ध आहोत, भारताने नेहमीच द्विपक्षीय करार पाळले आहेत असेही ते म्हणाले. आपल्या सुरक्षा दलांनी कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्याचे पराक्रम सिद्ध केले आहे. त्यामुळेच देशात सार्वभौमता टिकवण्यासाठी आपल्या सुरक्षा दले सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध राखण्यासाठी शांतता महत्वाची आहे. पण त्याचवेळी भारत आपल्या जागेपैकी एक इंचही कोणालाही देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ईस्टर्न लडाखच्या भागात भारत आणि चीनचे सैन्य हे टप्प्याटप्प्याने मागे घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चीनने गेल्या काही महिन्यात एलएसी जवळ मोठ्या प्रमाणात सैन्य आणि शस्त्रसाठा तैनात केला होता. त्याचवेळी भारतानेही खबरदारीचा उपाय म्हणून सीमा परिसरात सैन्य सज्ज ठेवले होते. पॅंगॉंग लेकनजीक भारत आणि चीनचे असलेले सैन्य हे काही टप्प्यात मागे घेण्यात दोन्ही देशांमध्ये चर्चा झाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

चीनसोबत भारताने सातत्याने संवाद साधल्यानेच पॅंगॉंग लेकच्या परिसरात सैन्य मागे घेण्यासाठी समझोता झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी दोन्ही देशांमध्ये असलेल्या करारांचे पालन करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. राजनाथ सिंह यांच्या राज्यसभेतील भाषणाआधीच बुधवारी एलएसीवर भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्याने मागे हटण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली होती. भारत चीन या दोन्ही देशांनी ठरविले आहे की, २०२० च्या आधी जी स्थिती दोन्ही देशांमध्ये होती ती परिस्थिती अंमलात आणली जावी. ज्या काही गोष्टी एलएसीवर तयार करण्यात आल्या आहेत, त्या गोष्टी हटविल्या जातील. भारतीय लष्कराच्या ज्या जवानांनी या दरम्यानच्या कालावधीत आपल्या प्राणांची आहूती देशासाठी दिली देश त्यांना नेहमीच सलाम करेल असेही ते म्हणाले. एलएसीवर कोणताही बदलाव होणार नाही. त्यामुळेच दोन्ही देशाच्या सेना या आपल्या मूळ जागेवर जातील असेही राजनाथ सिंह यांनी सभागृहाला सांगितले. चीनने १९६२ पासूनच भारतात अनेक भागात अतिक्रमण केले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. भारत चीन सीमेवरच्या सद्यपरिस्थितीचा परिणाम हा दोन्ही देशांच्या संबंधावरही होईल असे ते यावेळी म्हणाले.


 

 

First Published on: February 11, 2021 11:21 AM
Exit mobile version