दिल्लीत एकाच घरामध्ये सापडले ११ मृतदेह!

दिल्लीत एकाच घरामध्ये सापडले ११ मृतदेह!

एकाच घरात सापडलेत फासावर लटकलेले ११ मृतदेह

दिल्लीतील बुराडी परिसरामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील संतनगरमध्ये एकाच घरातील ११ व्यक्तींचे मृतदेह सापडले अाहेत. संतनगरच्या गुरुगोविंद सिंह हॉस्पिटल समोरील २ नंबरच्या गल्लीतल्या घरात ही घटना घडली आहे. ११ मृतांपैकी १० मृत व्यक्ती फासावर लटकलेल्या स्थितीत आढळून आलेत तर एका वृद्ध महिलेचा मृतदेह घरात जमिनीवर आढळून आला. यातील ७ मृतदेह महिलांचे असून ४ मृतदेह पुरुषांचे आहेत. मरणाऱ्यांपैकी काही मृतदेहांच्या डोळयांवर व तोंडावर पट्टी बांधलेली आढळून आली आहे, तर काहींचे हात व पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. तसेच मृतांमध्ये तीन किशोरवयीन मुलांचा देखील समावेश असल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेचे नेमके कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. ही घटना सामूहिक आत्महत्या तर नाही ना, याचा पोलीस तपास करीत आहेत. जर ही सामूहिक आत्महत्या असेल, तर याचे नेमके कारण काय असेल? किंवा हे सामूहिक हत्याकांड तर नाही ना, यादृष्टीने देखील तपास सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या मृतांमध्ये दोन भावांचे कुटुंब होते. एका भावाचा प्लायवूडचा व्यवसाय होता तर एका भावाचे किराणा दुकान होते. परिसरातील लोक या घटनेने खूप हळहळ व्यक्त करत असून या प्रकाराने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

यापूर्वी फेब्रुवारी २०१६ मध्ये मुंबईमध्ये देखील आशीच एक घटना घडली होती. ठाण्यातील एका इसमाने त्याच्या कुटुंबातील १४ लोकांची हत्या केली होती. हसीन वारकर नामक इसमाने त्याच्या कुटुंबातील १४ व्यक्तींची हत्या केली होती. यात त्या इसमाने त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबतच बहिणीच्या कुटुंबियांची देखील हत्या केली होती. हत्येत ७ बालकांचा समावेश होता. मात्र या हत्येतून त्या इसमाची बहीण वाचली होती. बहिणीमुळे आरोपीला पकडण्यात पोलीसांना मदत मिळाली होती. या घटनेने देखील सर्वत्र खळबळ माजली होती.

First Published on: July 1, 2018 10:01 AM
Exit mobile version