निर्भयाच्या बलात्काऱ्यांची फाशी कायम; या दिवशी होणार शिक्षेची अंमलबजावणी

निर्भयाच्या बलात्काऱ्यांची फाशी कायम; या दिवशी होणार शिक्षेची अंमलबजावणी

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी

दिल्लीत २०१२ साली घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणात आरोपींची फाशी कायम ठेवण्यात आली आहे. पतियाळा कोर्टाने चारही आरोपींच्या विरोधात डेथ वॉरंट जारी केले आहे. यानंतर आरोपींना आता कोणताही कायदेशीर मार्ग अवलंबता येणार नाही. २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार आहे. निर्भया प्रकरणात पवन गुप्ता, विनय शर्मा, अक्षय ठाकूर आणि मुकेश सिंह हे चार आरोपी आहेत. तर राम सिंह याचा तुरुंगातच मृत्यू झालेला आहे.

पतियाळा कोर्टाने हा आदेश दिल्यानंतर सरकारी वकील आणि ज्येष्ठ विधिज्ञ उज्जल निकम यांनी समाधान व्यक्त केले. तसेच २२ जानेवारी पर्यंत सरकारने खबरदारी घेण्याचीही सूचना केली आहे. कारण निर्भया प्रकरणातील आरोपी हे निगरगट्ट असून ते कायद्याच्या पळवाटीचा मोठ्या खुबीने वापर करत आले आहेत. त्यामुळे उरलेल्या दिवसांत त्यांना संधी मिळू नये यासाठी प्रशासनाने जागृत रहावे, असे उज्ज्वल निकम म्हणाले आहेत.

आरोपींचे वकील ए.पी. सिंग यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आमच्याकडे आणखी कायदेशीर उपाय बाकी आहेत. २२ जानेवारीच्या आधी आम्ही सुप्रीम कोर्टात पुन्हा अपील करु शकतो.”

 

First Published on: January 7, 2020 4:52 PM
Exit mobile version