सरकारच्या ‘भिंतीमुळे’ शेतकऱ्यांचे पाण्याविना हाल, आंदोलन चिघळणार

सरकारच्या ‘भिंतीमुळे’ शेतकऱ्यांचे पाण्याविना हाल, आंदोलन चिघळणार

कृषी कायद्यां विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसणाऱ्या शेतकऱ्यांचे दिल्ली सीमेवर हाल होत आहेत. हे आंदोलक दिल्लीत शिरू नयेत यासाठी सिंघु, टिकरी आणि गाझीपूर येथे पोलिसांनी नाकाबंदी केली असून भिंतीसह तारेचे कुंपन व विविध अडथळे उभारले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळनेही दुरापास्त झाले आहे. यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारच्या दडपशाहीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून ‘काहीही करा पण आम्ही मागे हटणार नाही’ असा पवित्रा आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला आहे. यामुळे २६ जानेवारीप्रमाणे ६ फेब्रुवारीलाही हे आंदोलन पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंघु, टिकरी आणि गाझीपूर या तीनही सीमेवर दिल्ली पोलिसांनी सिमेंट कॉंक्रेटची भिंत उभारली आहे. तसेच या कॉंक्रीटमध्ये खिळेही रुतवण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांना रोखण्यासाठी चारही बाजूला पोलीस व सीआरपीएफच्या जवानांची फौजच येथे तळ ठोकून आहे. यामुळे पाण्याच्या टँकर व शौचालयापर्यंत पोहचणेही शेतकऱ्यांना अशक्य झाले आहे. त्यातही महिला शेतकरी आंदोलकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. २६ जानेवारीला शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून दिल्लीत प्रवेश केला होता. त्यामुळे दिल्ली पोलीस व आंदोलक शेतकरी यांच्यात संर्घष झाला होता. तसाच अनर्थ पुन्हा होऊ नये यासाठी पोलिसांनी दिल्ली सीमेवर हे भक्कम अडथळे उभारले आहेत. तसेच आंदोलनस्थळी इंटरनेटसेवाही बंद करण्यात आली आहे. यामुळे आंदोलक अधिकच चवताळले आहेत. शेतकऱ्यांनी ६ फेब्रुवारीला देशव्यापी ‘चक्का जाम’ची घोषणा केली आहे. याचपार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी ही नाकाबंदी केली आहे.

First Published on: February 3, 2021 1:43 PM
Exit mobile version