राज्यपालांच्या कार्यालयातील १३ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह!

राज्यपालांच्या कार्यालयातील १३ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह!

देशभरात कोरोनाचा फैलाव अजूनही सुरूच असून भारतात लॉकडाऊन शिथिल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा केव्हाच दीड लाखांच्या वर गेला आहे. त्यासोबतच मृतांचा आकडा देखील ५ हजारांच्या वर गेला असताना देशात अनलॉक १.० आजपासून लागू झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयातले तब्बल १३ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आता दिल्ली प्रशासनाकडून तातडीने यावर हालचाली केल्या जात आहेत.

राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार राज निवास मार्गावर असलेल्या राज्यपालांच्या कार्यालयातल्या १३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यपाल कार्यालयात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सगळ्यात आधी कार्यालयातला एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला होता. मात्र, आता ही संख्या १३ झाली आहे.

दिल्लीत राज्यपालांच्या कार्यालयातच कोरोनानं हातपाय पसरले असताना देशभरात मंगळवारी ८ हजार १७१ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर २०४ रुग्णांचा गेल्या २४ तासांमध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातल्या कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १ लाख ९८ हजार ७०६ पर्यंत गेला आहे.

First Published on: June 2, 2020 4:33 PM
Exit mobile version