मुलगी झाली म्हणून करत होता सेलिब्रेशन; पोलिसांनी दाखल केला गुन्हा

मुलगी झाली म्हणून करत होता सेलिब्रेशन; पोलिसांनी दाखल केला गुन्हा

ऐकावं ते नवलच!… मुलगी झाली म्हणून अनेक जण आनंद व्यक्त करताना दिसतात. मात्र नवी दिल्ली येथील चाणक्यपुरी विभागात एका व्यक्तीला मुलगी झाली, त्याचा आनंद तो आपल्या घराजवळ साजरा करत होता. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर एफआयआर दाखल केला. कारण आनंदोत्सव साजरा करताना त्यांनी नियमांचे आणि कायद्याचे उल्लंघन केले. हा आनंद सेलिब्रेट करताना त्याने मोठा आवाज करणारे फटाके फोडले. त्यामुळे पोलीस त्याच्या घरी दाखल होऊन त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

फटाके फोडण्यास परवानगी पण…

हा व्यक्ती चाणक्यपुरीमध्ये वास्तव्यास असून विशेष म्हणजे त्याचे घर पंतप्रधानांच्या निवास स्थानाजवळ आहे. त्यामुळे व्यक्तीला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये मोठा आवाज करणारे फटाके फोडण्यास मनाई आहे. सुप्रीम कोर्टाने दिवाळीत प्रदूषण न करणारे फटाके फोडण्यास परवानगी दिली असली तरी या फटाकांचा आवाज चार मीटर लांबीवर १२५ डेसिबल पेक्षा जास्त नसावा.

अशी घडली घटना

चाणक्यपुरीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला मुलगी झाल्याने त्याने आनंद व्यक्त करण्यासाठी फटाके फोडले. या फटाक्याचा आवाज डेसिबलच्या बाहेर असल्याने तसेच त्याने कायद्याचे आणि नियमांचे उल्लघंन केल्याने पोलिसांना कंट्रोल रूमवर तक्रार मिळाली.

पोलिसांना कंट्रोल रूमवर मिळणारी तक्रार अशी होती की, ‘कोणी व्यक्ती पंतप्रधान निवास स्थानाबाहेर फटाके फोडत आहे’. त्याठिकाणी पोलिसांची टीम पोहचली. तेव्हा फटकांचा आवाज तेथील शक्ती माता मंदिराच्या दिशेने सीपीडब्ल्यूडी कंपाऊंडकडून येत होता. यावेळी पोलीस तेथे पोहचले तेव्हा एक व्यक्ती आनंदाने फटाके फोडत होता. मोठ्या आवाजाचे फटाके फोडणे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. फटाके फोडणार्‍या व्यक्तीचे नाव विवेक गुप्ता असल्याचे कळाले. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याच्या घरी मुलगी जन्मली आहे, त्यामुळे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मी फटाके फोडत हा आनंद व्यक्त करत असल्याचे त्याने सांगितेले. नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त डॉ. ईश सिंघल यांनी सांगितले की, आरोपीच्याविरोधात सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

First Published on: September 23, 2019 2:53 PM
Exit mobile version