Delhi Sakshi Murder Case : साक्षी हत्येमागे ‘लव्ह जिहाद’? काही नेत्यांनी केला दावा

Delhi Sakshi Murder Case : साक्षी हत्येमागे ‘लव्ह जिहाद’? काही नेत्यांनी केला दावा

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाला (Shraddha Walker murder case) वर्ष होत नाही तोच राजधानी दिल्ली रविवारी आणखी एका हत्याकांडाने (Delhi Sakshi Murder Case) हादरली. शाहबाद डेअरी परिसरात एका 16 वर्षीय मुलीची तिच्या प्रियकराकडून तब्बल 40 वार करून हत्या करण्यात आली. श्रद्धा वालकर प्रकरणाप्रमाणेच आता या हत्याप्रकरणाबद्दल ‘लव्ह जिहाद’चा (Love Jihad) संशय व्यक्त करण्यात येत आहे. काही राजकीय पक्षांनी या प्रकरणावरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

शाहबाद डेअरी परिसरातील जे. जे. कॉलनीमध्ये 16 वर्षीय साक्षी (Sakshi) वास्तव्यास होती. 20 वर्षीय साहिल (Sahil) आणि साक्षी हे दोघेही एकमेकांना ओळखत होते. या दोघांमध्ये प्रेमसंबंधही होते. पण शनिवारी (ता. 27 मे) या दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाला. रविवारी साक्षी आपल्या एका मित्राच्या वाढदिवसाकरिता जात असताना, साहिलने तिला रस्त्यात अडवले आणि तिच्यावर 40 वार करत तिची हत्या केली. साहिल फक्त तिच्यावर वार करूनच थांबला नाही तर त्याने तिला दगडाने ठेचलेही. गजबजलेल्या परिसरात ही घटना घडत असताना देखील कोणीही पुढे येऊन साहिलला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून ती मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पोलिसांनी घटनेच्या काही तासांतच आरोपी साहिलला बुलंदशहर येथून अटक केली.

लव्ह जिहादचे प्रकार रोखण्याची गरज – शिवसेना

शाहबाद डेअरी परिसरातील या घटनेनंतर आई-वडिलांचे सांत्वन करण्यासाठी विविध पक्षांचे लोक साक्षीच्या घरी गेले होते. शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप चौधरी, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विनोद सेहरावत यांच्यासह परिसरातील भाजपा नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी साक्षीच्या पालकांची भेट घेतली. साहिलने गंभीर गुन्हा केला आहे. हे लव्ह जिहादचे प्रकरण आहे. साहिलने त्याच्या हातावर पूजेचा धागा (Rakshasutra) बांधला होता. पण साक्षीची हत्या करताना आपण पठाण, मुस्लीम असल्याचे त्याने सांगितले. हे समाजासाठी धोकादायक असून असले प्रकार रोखण्याची गरज आहे, असे सांगून संदीप चौधरी म्हणाले की, मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे, जेणेकरुन ते अशा मुलांच्या जाळ्यात अडकणार नाहीत.

साहिलचा मास्टर माईंड कोण आहे?

भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विनोद सेहरावत यांनी, हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा दावा केला. साहिल खानने आधी स्वत: हिंदू असल्याचे भासवून मुलीला फसवले. मुलगा हिंदू नसल्याचे मुलीला तसेच तिच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर साक्षीने त्याच्याशी बोलणे बंद केले. म्हणून चाकूचे सपासप वार करून तसेच दगडाने ठेचून साक्षीचा खून करण्यात आला, असे त्यांनी सांगितले.

आजूबाजूच्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साहिल हा अनेक दिवसांपासून साक्षीला त्रास देत होता. मुलीने विरोध केल्यावर त्याने तिची निर्घृण हत्या केली. आरोपी मुस्लीम आहे, मात्र त्याचा हात पूजेचा धागा बांधलेला होता, यावरून तो लव्ह जिहाद टोळीशी निगडीत असल्याचे दिसते. असे असतानाही मुस्लीम व्होट बँक डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल खरे बोलणे टाळत आहेत. या हत्येचा संबंध ते कायदा आणि सुव्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी देखील ट्वीट करत, आरोपी साहिलच्या हातात पूजेचा धागा कसा? हा लव्ह जिहादचा प्रकार असून मुलींवरील हा सुनियोजित हल्ला आहे. साहिलचा मास्टर माईंड कोण आहे? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

लव्ह जिहादचे लोण दिल्लीपर्यंत – विहिंप

विश्व हिंदू परिषदेने देखील साक्षीची हत्या म्हणजे लव्ह जिहाद असल्याचे म्हटले आहे. ही घटना म्हणजे स्पष्टपणे लव्ह जिहादच आहे, असे विहिंपच्या सुखदेव नगर ब्लॉकचे सह-मंत्री कपिल कपूर यांनी सांगितले. विहिंपच्या वरिष्ठ सहकाऱ्यांसह आपण साक्षीच्या पालकांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी साक्षीच्या हत्येबद्दल शोक शोक व्यक्त करून, हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे म्हटले आहे. इतर राज्यांपाठोपाठ आता दिल्लीतही आता लव्ह जिहादचे लोण पसरले असून त्यातून हिंदू मुलींची हत्या होत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे आणि हा एक गंभीर इशारा आहे, असे ते म्हणाले.

First Published on: May 30, 2023 10:45 AM
Exit mobile version