सचिन पायलट यांचे बंड शमले

सचिन पायलट यांचे बंड शमले

मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट

काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांचे बंड शमले आहे. त्यांनी गुरुवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात भारतीय जनता पक्ष अशोक गेहलोत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करणार आहे. त्याबाबत गेहलोत आणि पायलट यांच्यात चर्चा झाल्याचे सांगितले जाते.

राजस्थानात जी राजकीय उलथापालथ सचिन पायलट यांनी घडवली होती त्यानंतर ते वेगळी चूल मांडतील, असे चित्र दिसत होते. मात्र राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या शिष्टाईमुळे सचिन पायलट यांचे बंड शमले. त्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाली. राजस्थान काँग्रेसमधल्या अंतर्गत लाथाळ्या सचिन पायलट यांच्या बंडानंतर पाहण्यास मिळाल्या. आता बंड शमल्यानंतर पहिल्यांदाच सचिन पायलट हे गेहलोत यांच्या भेटीला पोहचले आहेत. शुक्रवारी होणार्‍या अधिवेशनात काय रणनीती आखायची या चर्चेत ते सभागी झाले आहेत.

मागच्याच महिन्यात सचिन पायलट यांनी काँग्रेस पक्षाविरोधात बंडाचा झेंडा उगारला होता. सचिन पायलट यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यांना उपमुख्यमंत्रीपदावरूनही हटवण्यात आले. त्यानंतर सचिन पायलट हे भाजपासोबत हातमिळवणी करतील किंवा वेगळा पक्ष स्थापन करतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. एवढेच नाही तर गेहलोत सरकार अल्पमतातही आले होते. कारण आपल्यासोबत १८ पेक्षा जास्त आमदार घेऊन सचिन पायलट बाहेर पडले होते.

या दरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी काँग्रेसमध्ये झडल्या. अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांना निक्कमा म्हटले होते. त्यामुळे सचिन पायलट चांगलेच नाराज झाले होते. दरम्यान, आधी आरोपांच्या फैरी झाल्यानंतर चर्चांच्या फेर्‍या झाल्या. सचिन पायलट यांनी काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळीच सचिन पायलट यांची घरवापसी होणार हे निश्चित झाले होते. अपेक्षेप्रमाणे तेच घडले. आता बंड थंड झाल्यानंतर सचिन पायलट हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. शुक्रवारी होणार्‍या अधिवेशनासंबंधीची चर्चा या दोघांमध्ये होत आहे.

First Published on: August 14, 2020 7:11 AM
Exit mobile version