पश्चिम बंगाल-आंध्र प्रदेश वगळता संपूर्ण देशात हवाई सेवा सुरू

पश्चिम बंगाल-आंध्र प्रदेश वगळता संपूर्ण देशात हवाई सेवा सुरू

विमानसेवा

चीनमधील वुहान शहरातून संपूर्ण जगापर्यंत पसरलेल्या कोरोनाच्या संसर्गाची वाढणारी गती रोखण्यासाठी देशभरात २५ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यानंतर विमान सेवाही विस्कळीत झाली. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात जनतेला काही सवलती देण्यात आल्यानंतर देशात २५ मे पासून देशांतर्गत विमान सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असला तरीही आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे विमान सेवा अद्याप सुरू होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल वगळता संपूर्ण देशांत २५ मेपासून देशांतर्गत विमान सेवा सुरू झाली असून दिल्ली विमानतळावरून पहाटे ४.४५ वाजता पहिले उड्डाण पुण्याच्या दिशेने रवाना झाले. तर मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण सकाळी ६.४५ वाजता पटनाकडे निघाले.

आंध्र प्रदेश-पश्चिम बंगालमध्ये या दिवशी विमान सेवा सुरू

नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याबाबत ट्विट केले होते की, “देशातील नागरी उड्डाणांच्या कामांची शिफारस करण्यासाठी विविध राज्यांशी चर्चा करण्यात आली.” आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल वगळता सोमवारपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू होतील. तसेच, सोमवारी मुंबई व राज्यातील इतर विमानतळावरून मंजूर झालेल्या वेळापत्रकानुसार मुंबईहून मर्यादित उड्डाणे असतील. त्याचबरोबर आंध्र प्रदेशात २६ मे आणि पश्चिम बंगालमधून २८ मे रोजी देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्यात येणार असल्याचेही हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले.

प्रवासासंदर्भात प्रत्येक राज्यांसाठी आपापले नियम जारी

सुमारे दोन महिन्यांनंतर विमानतळावर देशांतर्गत विमान सेवा सुरू होणार असल्याने विशेष तयारी करण्यात आली आहे. आता विमानतळावर सर्व गोष्टी नवीन नियमाने होणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विमानतळावर दोन मीटर अंतर आणि टचलेस सिस्टमचे पालन करण्यात येईल. राज्य सरकारांनी हवाई प्रवासासंदर्भात आपापल्या राज्यांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.

तसेच, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा आणि  जम्मू-काश्मीर अशा काही राज्यांनी प्रवाशांच्या क्वारंटाईनबाबत काही वेगळी नियमावली तयार केली आहे. काही राज्यांनी प्रवाशांना संस्थागत क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही प्रवाशांनी होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

 

First Published on: May 25, 2020 9:43 AM
Exit mobile version